अभियांत्रिकी शाखेच्या प्रवेशासाठी रविवारी घेण्यात आलेल्या जॉइंट एन्ट्रन्स मेन्स एक्झामसाठी (जेईई) परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यास उशीर झाल्यामुळे दोन विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देण्यात आले नाही, तर काही केंद्रांवर विद्यार्थ्यांकडे बारावीची प्रवेशपत्रे नसल्यामुळे थोडे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र शहरातील बहुतांशी केंद्रांवर परीक्षा सुरळीत पार पडली.
राज्यातील अभियांत्रिकी परीक्षेच्या प्रवेशासाठी यंदा प्रथमच जेईई घेण्यात आली. देशातून साधारण १३ लाख ५६ हजार विद्यार्थी जेईईसाठी बसले असून त्यापैकी ११ लाख ८४ हजार विद्यार्थ्यांनी रविवारी परीक्षा दिली. १ लाख ७४ हजार विद्यार्थी कॉम्प्युटर बेस परीक्षा देणार आहेत. पुण्यात साधारण २५० केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली असून पुणे केंद्रावरून साधारण ३५ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. पुण्यातील स्प्रिंगडेल शाळेतील परीक्षा केंद्रावर विद्यार्थी उशिरा पोहोचल्यामुळे त्याला परीक्षेला बसू देण्यात आले नाही. त्यामुळे या केंद्रावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परीक्षा सकाळी ९.३० ला सुरू झाली. त्यानंतर परीक्षा केंद्रावर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षकांनी वर्गात बसू दिले नाही. त्यामुळे पालकांनी केंद्राबाहेर गोंधळ घातला. केंद्रीय परीक्षा मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना बोलावून पालकांना पांगवले.
‘रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे परीक्षा केंद्रावर पोहोचण्यास उशीर झाला. त्याचप्रमाणे सिंहगडचे आवारही मोठे आहे. त्यामुळे स्प्रिंगडेल शाळा आणि वर्ग शोधण्यास वेळ लागला,’ असे विद्यार्थ्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना खूप उशीर झाला नव्हता, असे असतानाही त्यांना परीक्षेला बसू देण्यात आले नाही, अशी तक्रार पालकांनी केली आहे. ‘परीक्षेपूर्वी पंधरा मिनिटे विद्यार्थ्यांनी आपल्या जागेवर बसणे अपेक्षित होते. परीक्षा सुरू होऊनही विद्यार्थी परीक्षा केंद्रावर उपस्थित न राहिल्यामुळे त्याला नियमानुसार परीक्षेला बसण्यास मनाई करण्यात आली,’ असे परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
कट ऑफ साधारण ११० गुण?
परीक्षा राज्याच्या सीईटीपेक्षा कठीण असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. प्रत्येक राज्य किंवा केंद्रीय परीक्षा मंडळाच्या पहिल्या २० पर्सेटाईल असलेले विद्यार्थी हे जेईई अॅडव्हान्स परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत. या परीक्षेबाबत आयआयटी प्रतिष्ठानचे दुर्गेश मंगेशकर यांनी सांगितले, ‘जे विद्यार्थी आयआयटीची पूर्वीपासून तयारी करत होते, त्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा सोपी गेल्याचे दिसत आहे. मात्र, बारावीची परीक्षा झाल्यानंतर किंवा सीईटीच्या धरतीवर ज्यांनी परीक्षेची तयारी केली अशा विद्यार्थ्यांना परीक्षा कठीण गेल्याची तक्रार आहे. जेईई अॅडव्हान्ससाठी साधारण ११० गुणांपर्यंत कट ऑफ असू शकेल. या वेळी रसायनशास्त्रामध्ये इनऑरगॅनिक केमेस्ट्रीचे दोनच प्रश्न विचारण्यात आले होते.’
जेईईची कॉम्प्युटर बेस परीक्षा ९, ११ आणि १२ एप्रिलला होणार आहे. २७ आणि २८ एप्रिलला परीक्षेची उत्तरसूची जाहीर करण्यात येणार आहे. परीक्षेचा निकाल ३ मे रोजी जाहीर होणार आहे.

Story img Loader