पुणे : सिंहगड घाट रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणारी जीप उलटून दहा पर्यटक जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. सिंहगड घाट रस्त्यावरुन रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास पर्यटकांना घेऊन जीप पायथ्याकडे निघाली होती. वळणावर जीप अचानक उलटली. तेथून जाणाऱ्या अन्य वाहनचालकांनी जीपमधील पर्यटकांना बाहेर काढले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जीपचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात घडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
दरम्यान, रविवारी सकाळी सिंहगड किल्ल्यावर विद्यार्थ्यांची सहल आली होती. विद्यार्थ्यांना गडावर घेऊन आलेल्या जीपचा गाडीतळाजवळील तीव्र उतारावर ब्रेक निकामी झाला. अपघातात एक विद्यार्थी जखमी झाला, अशी माहिती वनविभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
हेही वाचा >>>शिक्षक भरती उमेदवारांना दिलासा… शिक्षण आयुक्तांनी दिला महत्त्वाचा आदेश…
घाटरस्त्यावर जीवघेणी प्रवासी वाहतूक
सिंहगड घाट रस्त्यावर रविवारी दिवसभरात दोन अपघात झाले. पर्यटकांना पायथ्यावरुन गडापर्यंत नेण्यासाठी जीपचा वापर करण्यात येतो. प्रवासी वाहतूक करणारी वाहने सुस्थितीत नसतात. सिंहगड घाट रस्त्यावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करुन कारवाई करण्यासाठी वनविभागाने प्रादेशिक परिवहन विभागाला (आरटीओ) पत्र दिले होते. मात्र, अद्याप कारवाई करण्यात आली नाही. धोकादायक पद्धतीने प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात यावे, असे पत्र पुन्हा आरटीओकडे देण्यात येणार असल्याचे वनरक्षक बळीराम वायकर यांनी सांगितले.