पुणे जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातील महिलांना संगणक साक्षरतेबरोबरच इतरही विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे करीत त्यांच्या जीवनामध्ये आशेची ज्योत तेवत ठेवण्याचे काम ‘जीवन ज्योती’ ही संस्था करीत आहे. केवळ संगणक साक्षरता एवढाच या उपक्रमाचा एकमेव उद्देश नाही तर महिलांना आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी करण्यातही संस्थेचे मोठे योगदान आहे.
ग्रामीण युवती आणि महिलांना सक्षम करण्याच्या उद्देशातून आंबवणे (ता. वेल्हे) या गावी ५ सप्टेंबर २०१४ रोजी जीवन ज्योती महिला सक्षमीकरण संस्थेची स्थापना झाली. स्टरलाइट टेक फाउंडेशन आणि ज्ञान प्रबोधिनी संस्था यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. स्टरलाइट टेक फाउंडेशनच्या उद्योगांचे सामाजिक उत्तरदायीत्व (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी-सीएसआर) उपक्रमात हे काम सुरू असून जीवन ज्योती संस्थेमध्ये वेल्हे आणि भोर या तालुक्यातील ९३ गावांतील युवती आणि महिला प्रशिक्षण घेत आहेत. संस्थेमार्फत महाराष्ट्र शासनाचे एम. एस. ऑफिस, डेटा एन्ट्री ऑपरेटर हे अभ्यासक्रम, टेलरिंग आणि कटिंग, बेसिक फॅशन डिझायनिंग, ब्युटी कल्चर हे प्रत्येकी सहा महिने कालावधीचे तर, महाराष्ट्र शासनाचा एक वर्ष कालावधीचा नर्सिग असे विविध अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत. आतापर्यंत ५६१ विद्यार्थिनींनी संस्थेतील विविध अभ्यासक्रम पूर्ण केले असून स्वत:च्या पायावर उभ्या राहत त्या आर्थिक स्वावलंबी झाल्या आहेत. उच्चशिक्षित महिला प्रशिक्षक, प्रशस्त जागा, आधुनिक यंत्रसामग्रीची उपलब्धता, युवती आणि महिलांना अल्प दरात प्रशिक्षण, योगशाळा, ग्रंथालय अशा सोयीसुविधा संस्थेने उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनी गृहिणी असतील, तर त्यांच्या एक ते चार वर्षे वयोगटातील मुलांसाठी पाळणाघराची सोय देखील करण्यात आली आहे.
संगणकाचे ज्ञान असणे ही काळाची गरज बनली आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात संगणकाचा मुक्त वापर होत असून संगणकाच्या वापरामुळे अनेक अवघड आणि वेळखाऊ कामे सोपी झाली आहेत. आपल्या दैनंदिन व्यवहारात आरक्षण, रुग्णालय, शाळा, बँका, हॉटेल्स, व्यापारी, कारखाने, सेवा क्षेत्र, कृषी क्षेत्र, सरकारी आणि खासगी कार्यालये अशा सर्वच ठिकाणी संगणकाचा वापर केला जात आहे. बऱ्याचदा आपल्याला हवी असलेली माहिती आणि कागदपत्रे संबंधित कार्यालयात व्यक्तिश: न जाता इंटरनेटच्या माध्यमातून संगणकावर सहजगत्या उपलब्ध होतात. परीक्षेचे आणि नोकरीचे अर्ज भरण्यापासून ते निकालापर्यंत सर्व गोष्टी इंटरनेटवर उपलब्ध होत असतात. त्यासाठी संगणकाचे ज्ञान घेणे महत्त्वाचे आहे. पूर्वी ज्याला अक्षर कळत नाही, त्यालाच निरक्षर म्हटले जात होते. मात्र, आता ज्याला संगणक वापरता येत नाही त्यालाही निरक्षर मानले जाते. संगणकाचे शिक्षण घेऊन व्यवसाय किंवा नोकरी म्हणून निवड केलेले कित्येक लोक जीवनामध्ये यशस्वी झाले आहेत. अनेकांनी देश-विदेशामध्ये चांगल्या पगाराच्या नोकऱ्याही संपादन केल्या आहेत. संगणकाचे ज्ञान ही काळाची गरज बनली आहे, हे ओळखून जीवन ज्योती संस्थेतर्फे ग्रामीण भागातील युवती आणि महिलांना संगणकाचे ज्ञान देण्याचे शिवधनुष्य पेलण्याचे ठरविले आहे. अनेक महिला आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी झाल्या असून संस्थेचे काम योग्य दिशेने चालले असल्याची ही पावती आहे. जीवन ज्योती संस्थेच्या ज्योती अगरवाल यांचे या कामात मोठे योगदान आहे. ज्या उद्देशाने हे काम सुरू करण्यात आले, तो उद्देश यशस्वी होत आहे. ग्रामीण भागातील युवती आणि महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी संस्थेतील सर्व अभ्यासक्रम उपयुक्त ठरत आहेत, असे मनोगत ज्ञान प्रबोधिनीच्या प्रकल्प अधिकारी सुवर्णा गोखले यांनी व्यक्त केले.