जेजुरी,वार्ताहर
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेसाठी सुमारे दोन लाख भाविकांनी गर्दी केली होती. सोमवारी सकाळी सात वाजता मुख्य इनामदार पेशवे, खोमणे,माळवदकर यांनी सूचना करताच खांदेकऱ्यांनी पालखी उचलून खांद्यावर घेतली. देव कऱ्हा नदीवर स्नानासाठी निघाले.पालखीची मंदिर प्रदक्षणा झाल्यावर त्यामध्ये पुजाऱ्यांनी खंडोबा म्हाळसादेवीच्या उत्सव मूर्ती आणून ठेवल्या.
सदानंदाचा येळकोटचा जयघोष आणि भंडाऱ्याची उधळण
“सदानंदाचा येळकोट” असा जयघोष करीत भाविकांनी पिवळ्या धमक भंडाऱ्याची मुक्त उधळण केली.देवा तुझी सोन्याची जेजुरी या उक्तीप्रमाणे खंडोबा गड सोन्यासारखा उजळून निघाला.सनई चौघड्याच्या निनादात देवांचा पालखी सोहळा सुरू झाला. यावेळी बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देण्यात आली.खंडोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त पोपटराव खोमणे व इतर विश्वस्त यावेळी उपस्थित होते.पालखी गड उतरून खाली आली. ऐतिहासिक छत्री मंदिरमार्गे कऱ्हा नदीवर पोहोचली.पालखीच्या अग्रभागी मानाचा अश्व होता.धार्मिक वातावरणात पालखीतील खंडोबा माळसादेवीच्या मूर्तींना पवित्र कऱ्हा नदीतील पाण्याने स्नान घालण्यात आले.हा सोहळा अनुभवण्यासाठी हजारो भाविक उपस्थित होते.अडीच वाजता पालखी गावातील ग्रामदैवत जानुबाई मंदिरात आणून ठेवण्यात आली. यावेळी दर्शनासाठी मोठी गर्दी उसळली.रात्री सात वाजता पालखी पुन्हा खंडोबा गडावर आणण्यात आली. रोज मोरा (ज्वारी) वाटून पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली.
पालखी सोहळ्यात अनुचित प्रकार टाळण्यासाठी विशेष व्यवस्था
मागील सोमवती यात्रेत गडावरून पालखी खाली उतरताना चेंगराचेंगरी होऊन आठ जण जखमी झाले होते,त्यामुळे खंडोबा देवस्थान व पोलीस प्रशासन यांनी पालखी सोहळा व्यवस्थित पार पडण्यासाठी विशेष काळजी घेतली होती. पालखी अवजड असल्याने तिला खांदा देणारे खांदेकरी हे नेहमीचे व माहितगार असतात, अनेक भाविक मध्ये घुसून पालखीला खांदा देण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे पालखी घसरून अपघात होतात म्हणून यावेळी चौदाशे खांदेकर्यांना रंगीत शर्ट देण्यात आले होते. आवश्यक तेथे पोलिसांनी अडथळे उभारून भाविकांची गर्दी रोखली होती. त्यामुळे पालखी सोहळा व्यवस्थित पार पडला.
मुख्य वाहतूक सुरळीत ठेवण्यास पोलिसांना यश
दरवेळी सोमवती यात्रेत जेजुरीत भाविकांची हजारो वाहने येत असल्याने मुख्य रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होऊन तास दीड तास लोकांना अडकून पडावे लागत होते. यावेळी जेजुरीचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांनी मुख्य रस्त्यावर आवश्यक तेथे पोलीस बंदोबस्त ठेवला होता.रस्त्याच्या मध्यभागी लोखंडी कठडे उभारल्याने वाहतूक सुरळीत राहिली, तर अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने वळवण्यात आले होते. राष्ट्रीय महामार्ग असलेल्या मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी अजिबात जाणवली नाही. दिवाळी व सोमवती यात्रा एकत्र आल्याने वाहनांची संख्या खूप होती.