जेजुरी : साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीतील कडेपठारच्या डोंगर परिसरात अधिवास करीत असलेल्या पशु -पक्ष्यांचे प्यायला पाणी मिळत नसल्याने हाल सुरू झाले होते, मात्र येथील सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या जयमल्हार फाउंडेशनच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डोंगरातील पाणवठ्यामध्ये टॅंकरने पाणी भरण्यास सुरुवात झाली आहे .
शुक्रवारी (दि.२१ ) जागतिक वन दिनाच्या निमित्ताने पशु-पक्ष्यांसाठी टॅंकरने पाणीपुरवठा व धान्य पुरवठा या सेवा कार्यास सुरुवात करण्यात आली. गेली अकरा वर्षे जयमल्हार फाउंडेशनचे अध्यक्ष विशाल बारभाई व त्यांचे सहकारी ,वन खाते व स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने हा सेवा प्रकल्प राबवीत आहेत. शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी सचिन कुंभार व तुषार कुंभार यांनी पहिला टँकर दिला. यावेळी सासवड परिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल सागर ढोले, जेजुरीचे वनपाल राहुल रासकर ,वनरक्षक सोनाली कांबळे ,वनसेवक गजानन बयास, वनरक्षक जी.आर .निरडे, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल सोनवणे, प्रा. रघुनाथ वाहुळ,समीर मोरे, अमोल भंडारी, मनोज बारसुडे आदि उपस्थित होते .
मागील वर्षी कडेपठारच्या डोंगरात पुरेसा पाऊस न झाल्याने सारा डोंगर ओसाड झाला आहे. कुठेही पाण्याचे स्त्रोत शिल्लक नाहीत, त्यामुळे या डोंगरांमध्ये असणारे वन्यजीव सैराभैरा झालेत.या ठिकाणी वन खात्याने ८ ठिकाणी गोल हौद तयार करून पशुपक्ष्यांसाठी पाणवठे बनवलेले आहेत. या पाणवठ्यामध्ये लोकसहभागातून टॅंकरने पाणी भरण्याचा उपक्रम जय मल्हार फाउंडेशन राबवित आहे. दररोज दोन टँकरप्रमाणे ४ महिने पाणीपुरवठा करावा लागणार असून यासाठी २४० टँकरची गरज आहे.
कडेपठारचा डोंगर हा सह्याद्रीच्या रांगेमध्ये येतो .या परिसराला जयाद्री पर्वत असे संबोधले जाते. कडेपठारच्या डोंगरात कुलदैवत खंडोबाचे मूळ स्थान असून दररोज हजारो भाविक येथे देवदर्शनासाठी येत असतात. अनेक भाविकांना सायंकाळी गड चढताना हरीण ,मोरांचे दर्शनही घडते .या डोंगरात प्रामुख्याने हरीण ,चिंकारा, मोर, तरस ,लांडगे ,कोल्हे, सायाळ, ससा, खोकड ,उदमांजर आदी यांची संख्या लक्षणीय आहे. पावसाळ्यामध्ये डोंगरात पुरेसे पाणी उपलब्ध असते, मात्र उन्हाळा सुरू झाला की या प्राण्यांचे पाण्याअभावी हाल सुरू होतात .अनेक वेळा अन्न पाण्याच्या शोधार्थ यातील काही प्राणी मानवी वस्तीत येतात. या प्राण्यांना जागेवरच पाणी उपलब्ध व्हावे यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी हा उपक्रम गेल्या अकरा वर्षापासून यशस्वीपणे सुरू ठेवला आहे. सायंकाळी पाचनंतर बहुतांशी पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी प्राण्यांची गर्दी झालेली पाहायला मिळते. हेच पिण्याचे पाणी आजूबाजूच्या परिसरात चरायला गेलेल्या गाई म्हशी मेंढ्या शेळ्या यांनाही मिळते. या डोंगरात असलेल्या विविध पक्ष्यांची भूक भागावी म्हणून त्यांना पाणवठ्याच्या शेजारीच बाजरी, तांदूळ, ज्वारी, आदी धान्य टाकले जाते . पशुपक्ष्यांना धान्य व पाणी देण्याची योजना आता जेजुरी परिसरामध्ये लोकप्रिय झाली असून टँकर देण्यासाठी नंबर लागले आहेत. लग्नकार्य, वाढदिवस, वर्षश्राद्ध अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक जण टँकर देतात .
कडेपठारच्या डोंगरात हिरवीगार वनराई अत्यंत कमी असल्याने उन्हाळ्यात पशुपक्ष्यांचे हाल होतात. वनखाते दरवर्षी लागवड करून काही झाडे जगवत आहे मात्र डोंगरात वणवे लागण्याचे प्रकार सारखे घडत आहेत. त्यामुळे वनराई नष्ट होते. प्रामुख्याने झाडाखाली बसून गांजा, विडी, सिगरेट ओढणाऱ्यांमुळे या आगी लागत असल्याचे समजते. येणारे चार महिने टॅंकरने पाणी आणावे लागणार आहे . पावसाळा सुरू होऊन डोंगरांना पाझर फुटल्यावर ही योजना थांबवण्यात येते.
टँकर मिळण्यात खूप अडचणी – विशाल बारभाई
दररोज कडेपठारच्या डोंगर परिसरात दोन टँकर टाकण्याची आवश्यकता आहे .मात्र गावातील व्यावसायिकांकडून टँकर मिळण्यात खूप अडचणी येतात .सदर शेततळ्यांचे ठिकाण गावापासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर असून तेथे पोहोचण्यासाठी चांगले रस्ते नाहीत. कच्चा रस्ता खाजगी मालकांच्या शेत जमिनीतून जाताना अनेक ठिकाणी चढ-उतार , खराब रस्ते असल्याने वेळ लागतो. गाडी घसरण्याची, बिघडण्याची भीती वाटते. त्यामुळे बरेचसे टँकर चालक यायला नकार देतात. ज्यादा पैसे देऊनही टँकर मिळण्यासाठी यातायात करावी लागते . मात्र ग्रामस्थांच्या सहकार्याने योजना व्यवस्थित सुरू आहे. प्राणी मात्रावर दया करावी, त्यांना मदत करावी या भावनेने सुरू केलेल्या उपक्रमास स्थानिक लोकांचे खूप सहकार्य लाभत आहे, आमच्याकडे १२० दिवस पाणी पुरवण्यासाठी आहेत एकूण २४० टँकर लागणार मात्र आता देणाऱ्यांची संख्या ३०० पेक्षा आहे. ज्या कुटुंबाने टँकर दिला आहे त्या परिवाराला बोलावून त्यांच्या हस्ते तळी भरली जातात व त्यांना या सेवा प्रकल्पात सहभागी करून घेतले जाते.