प्रकाश खाडे, जेजुरी
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर शासनाच्या पुरातत्व खात्याकडून गड व मंदिर दुरुस्तीचे काम वेगात सुरू असून मराठेशाहीच्या थोर इतिहासाची साक्ष देणाऱ्या या गडाला पुन्हा ऐतिहासिक वैभव प्राप्त होणार आहे.कामे पूर्ण झाल्यानंतर ” देवा तुझी सोन्याची जेजुरी ” या उक्तीप्रमाणे खंडोबा गडाला सोन्याची झळाळी येणार आहे.येथे येणाऱ्या भाविक व पर्यटकांना गडाचे प्राचीन वैभव पाहायला मिळणार आहे.
विकास आराखड्यासाठी ३४९ कोटी ४५ लाखांचा निधी मंजूर
महाराष्ट्र शासनाने तीर्थक्षेत्र जेजुरी विकास आराखड्यासाठी ३४९ कोटी ४५ लाख रुपये २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात मंजूर केले आहेत.त्यातील पहिल्या टप्प्यातील १०९ कोटी ५७ लाख ९६ हजार खर्चाच्या कामास सुरुवात झाली आहे.जेजुरीचा खंडोबा अठरापगड जातीचे कुलदैवत असून २५० वर्षानंतर प्रथमच शासनाने खंडोबा गडाच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिल्याने ग्रामस्थ भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.काळाच्या ओघात गडामधे सिमेंट काँक्रीटची बांधकामे झाली,जुन्या दगडी भिंतींना रंग देण्यात आले,संगमरवरी फरशा घालण्यात आल्या, हे सर्व काढून खंडोबा गडाला पुन्हा मूळ स्वरूप दिले जाणार आहे.पावसाचे पाणी मुरल्यामुळे अनेक ठिकाणी दगडांची झीज झाली,अनेक आकर्षक दीपमाळा पडून नष्ट झाल्या, मात्र आता महाराष्ट्र शासनानेच पुरेसा निधी उपलब्ध करून दिल्याने गडाचे योग्य पद्धतीने संवर्धन व सुशोभीकरण होणार आहे.
कसं सुरु आहे काम?
७ ऑगस्ट रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार यांच्या उपस्थितीत गडावरील विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली हे सर्व काम होत असून यासाठी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे.पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कामे होत आहेत.गडाची दगडी तटबंदी,आतील ओवऱ्या यांची शास्त्रीय पद्धतीने स्वच्छता करून चुन्याने दर्जा भरल्या जात आहेत.पूर्वीच्या काळी दगडी बांधकामाला चुन्यामध्ये विविध पदार्थ मिसळून तो चुना वापरला जायचा तसेच मिश्रण तयार करून गडाचे मजबुतीकरण केले जात आहे.मुख्य मंदिरामधील संगमरवरी फरशा काढून दगडी फरशा बसविल्या जाणार आहेत.संपूर्ण गड व परिसराची शास्त्रीय पद्धतीने डागडुजी होत असल्याने खंडोबा गडाचे आयुष्यमान वाढणार आहे.पहिल्या टप्प्यातील कामासाठी ५० कारागीर दिवस-रात्र काम करीत आहेत.दोन वर्षात जेजुरी विकास आराखड्यातील कामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
खंडोबा गडाला ऐतिहासिक महत्त्व
जेजुरीचा खंडोबा हे मराठीशाहीचं कुलदैवत असून छत्रपती शिवराय आणि शहाजीराजे यांची गडावर भेट झाल्याचा उल्लेख आहे. मूळ खंडोबा मंदिर प्राचीन असून गडाच्या परिसरातील तटबंदी दीपमाळा याचे बांधकाम १५११ ते १७८५ मध्ये झालेले आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,मल्हारराव होळकर, तुकोजी होळकर, यांनी गडाच्या तटबंदीचे काळ्या पाषाणात बांधकाम केले.राघो मंबाजी, विठ्ठल शिवदेव यांनी गडामध्ये बांधकामे केली, खंडोबा गडाची उंची पायथ्यापासून ८०२ मीटर असून बांधकाम काळ्या पाषाणातील आहे,गडाच्या परिसरात ३५० दीपमाळा होत्या, त्यातील आता १४२ अस्तित्वात आहेत. पेशवाईच्या काळात सोनोरीचे सरदार रामराव व महिपतराव पानसे यांनी अर्पण केलेला शुद्ध पोलादाचा खंडा (तलवार ) गडावर आहे. पंचधातूच्या खंडोबा माळसादेवीच्या मूर्ती तंजावरचे व्यंकोजी भोसले,नाना फडणीस,सातारचे शाहू महाराज व ग्रामस्थांनी अर्पण केलेले आहेत.
विकास आराखड्यातून तीन टप्प्यात कामे
विकास आराखड्यानुसार पहिल्या टप्प्यात मुख्य खंडोबा मंदिर व इतर सहाय्यक संरचनासह संपूर्ण तटबंदीचे जतन व दुरुस्तीचे काम होणार आहे. यासाठी ११ कोटी २२ लाख ९६ हजार रुपये तर पायरी मार्गावरील दीपमाळा दुरुस्तीसाठी ११ कोटी ३५ लाख २५ हजार ४३१ रुपये तरतूद करण्यात आली आहे.
दुसऱ्या टप्प्यामध्ये गावातील होळकर तलाव, पेशवे तलाव इतर जलकुंड, विहिरी यांचे जतन व दुरुस्तीसाठी ११ कोटी ८९ लाख ५९ हजार रुपयाची तरतूद आहे.१२ कोटी ५६ लाख २३ हजार रुपयांची तरतूद कडेपठार डोंगरातील खंडोबा मंदिर आणि इतर सहाय्यक संरचना यांचे जतन व दुरुस्तीसाठी करण्यात आली आहे. प्राचीन लवथळेश्वर मंदिर ,बल्लाळेश्वर मंदिर, गौतमेश्वर मंदिर, दुरुस्ती केली जाणार आहे.
तिसऱ्या टप्प्यामध्ये गडाच्या पायरी मार्गावर असणाऱ्या कमानी दुरुस्त केल्या जाणार आहेत.मूलभूत पाया सुविधा, विद्युत सोयी, पाणीपुरवठा,घनकचरा व्यवस्थापन, मल नि:सारण,पाण्याचा पुनर्वापर, वायुविजन प्रणाली,मंदिर परिसरातील धूळ गोळा करण्यासाठी सामग्री यासाठी ५ कोटी १० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. गर्दीचे व्यवस्थापन आपत्कालीन व्यवस्थापन भाविकांना सुविधा, विश्वस्त कर्मचारी पुजारी सेवेकरी यांचे साठी आवश्यक सुविधा केल्या जाणार आहेत.
दोन वर्षात विकास आराखड्यातील कामे पूर्ण करणार
जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे दोन वर्षात पुरी करण्याचे नियोजन आहे. खंडोबा गडाचे योग्य प्रकारे संवर्धन होण्यासाठी कामे सुरू झाली आहेत. खंडोबा गडामध्ये १५ ऑक्टोबर रोजी घटस्थापना होत आहे. तोपर्यंत मुख्य मंदिराच्या गाभाऱ्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. गडावर देवदर्शनास येणाऱ्या ग्रामस्थ, भाविकांनी सहकार्य करावे.असे आवाहन पुरातत्त्व खात्याचे सहाय्यक संचालक विलास वाहने व खंडोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त पोपट खोमणे यांनी केले आहे.