महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबाला वाहण्यासाठी आणि उधळण्यासाठी हळकुंडाची हळद (भंडारा) व खोबरे सढळ हाताने वापरले जाते. परंतु, गेल्या महिन्यापासून खोबऱ्याच्या दरामध्ये चौपटीने वाढ झाल्याचा फटका जेजुरीत येणाऱ्या भाविकांना बसला आहे. वर्षांपूर्वी ६० ते ७० रुपये किलोने मिळणाऱ्या खोबऱ्याचा भाव किलोला २४० रुपये इतका झाल्याने भाविकांकडून होणाऱ्या खोबऱ्याच्या खरेदीत लक्षणीय घट झाली आहे.
जेजुरी येथे दररोज शेकडो पोती भंडारा व खोबरे भाविकांकडून खरेदी केले जाते. प्रामुख्याने तळी भंडारा करण्यासाठी खोबऱ्याच्या वाटय़ा लागतात, पण आता ही तळीसुद्धा महाग झाली आहे. जेजुरीत फटका राजापुरी (काळी पाठ) व मद्रास (लाल पाठ) खोबऱ्याची विक्री केली जाते. अगदी गरजेपुरती एकच खोबऱ्याची वाटी भाविक खरेदी करताना दिसत आहेत. यामुळे गडावरील कासवावर होणाऱ्या भंडार-खोबऱ्याच्या उधळणीत भाविकांना हात आखडता घ्यावा लागत आहे. जेजुरीत सध्या २४० ते २८० रुपये किलोने भंडार-खोबरे एकत्रित विकले जात आहे. हाच दर वर्षांपूर्वी ६० रुपये किलो होता. भाववाढ झाल्याने भाविकांकडून भंडार-खोबऱ्याच्या मागणीत कमालीची घट झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
याचा परिणाम जेजुरीतील आíथक उलाढालीवर होत आहे. गडाच्या पायथ्याला भाविक खोबरे खरेदी करतात. त्यापैकी काही उधळण्यासाठी असते, तर काही प्रसाद म्हणून घरी घेऊन जातात. सामान्यत: एक भाविक एक किलो ते सव्वा किलो खोबरे खरेदी करतो. आता ते प्रमाण केवळ पावशेरवर आले आहे किंवा आता तुकडेसुद्धा घेऊन जातात. जेजुरीत भंडारा-खोबऱ्याचा व्यापार करणारी शंभरावर दुकाने आहेत. हळदीचे भाव ७० ते ८० रुपये किलो असल्याने भंडाऱ्याला मागणी चांगली आहे. कोकण तसेच केरळ, तामिळनाडू भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे यंदा नारळाचे उत्पादन घटले आहे. यामुळे नारळ व खोबऱ्याच्या भावात प्रचंड वाढ झाल्याचे सांगितले जाते. येत्या सोमवारी (दि. २५ ऑगस्ट) जेजुरीत सोमवती अमावस्या आहे. या यात्रेसाठी लाखो भाविक येणार असून भाविकांना चढ्या भावाने भंडार-खोबरे खरेदी करावे लागणार आहे.
‘पहिल्यांदाच एवढी भाववाढ’
‘‘गेल्या तीस वर्षांत खोबऱ्याची एवढी भाववाढ प्रथमच पाहावयास मिळाली. मागणी घटल्याने नफ्याचे प्रमाण कमी झाले आहे. हवामानामुळे येणाऱ्या मालात खराब खोबरे निघण्याचे प्रमाणही वाढले आहे.’’
– अप्पा भंडारी (भंडार-खोबरे व्यापारी, जेजुरी)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा