जेजुरी : साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावरच्या मल्हारीचं नाव झटका मटणाला दिल्याबद्दल जेजुरी ग्रामस्थांच्या बैठकीमध्ये बंदरे व मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांचा निषेध करण्यात आला. त्याचबरोबर श्री खंडोबा गडाचा कारभार पाहणाऱ्या विश्वस्त मंडळापैकी पाच जणांनी मटणाला मल्हारी नाव देण्यास पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचाही तीव्र निषेध यावेळी करण्यात आला.

चार दिवसात विश्वस्त मंडळाने श्री खंडोबा देवाची , ग्रामस्थ व भाविकांची माफी मागावी अन्यथा त्यांना गाव बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. खांदेकरी – मानकरी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, माजी नगरसेवक हेमंत सोनवणे, खंडोबा देवस्थानचे माजी विश्वस्त संदीप जगताप, सुधीर गोडसे ,जेजुरीचे इनामदार राजाभाऊ पेशवे , छबन कुदळे , प्रसाद अत्रे ,शैलेश राऊत, ॲड मंगेश जेजुरीकर, रोहिदास माळवदकर , प्रतिक जोशी ,उमेश जगताप ,अनिल झगडे यांची यावेळी भाषणे झाली. ॲड .मंगेश जेजुरीकर यांनी मुळात खंडोबा देव शाकाहारी आहे .त्याचे नाव मटन ,दारू सारख्या विषयाला वापरणे चुकीचे आहे. यामुळे मल्हारी भक्तांच्या धार्मिक भावनेला तडा गेल्याचे सांगितले.

ग्रामस्थ मंडळाचे सचिव छबन कुदळे यांनी मुळात विश्वस्त मंडळ हे पुणे धर्मादाय आयुक्तांनी देवस्थानचा कारभार पाहण्यासाठी नेमले आहे.त्यांनी या मल्हार सर्टिफिकेशन वादात पडणे चुकीचे आहे.येथील परंपरागत मानकरी ,ग्रामस्थ ,पुजारी ,भाविक व सरकार बघून घेईल. मल्हारी देवाचे मान-पान, यात्रा ,जत्रा ,पालखी सोहळा हे आम्हाला माहिती आहे.आमच्या विरोधात निर्णय घेतला तर ते चालणार नाही.आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.आम्ही पोलीस ठाण्यात व धर्मादाय आयुक्तांकडे याविषयी तक्रार करण्यात असल्याचे सांगितले. माहिती अधिकार कार्यकर्ते गिरीश झगडे यांनी सध्याचे विश्वस्त मंडळ फक्त प्रसिद्धीच्या मागे लागले आहे .त्यांच्याकडून विकास कामाकडे पूर्ण दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला.

मल्हार सर्टिफिकेशन नावावरून जेजुरीत आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत .मल्हार गौतमेश्वर छत्री मंदिरावर झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीनंतर ग्रामस्थांनी जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपले म्हणणे मांडले. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी शिष्टमंडळाने दिलेले निवेदन स्वीकारले.

मल्हार नाव शेती किंवा आरोग्य योजनेला द्या – संदिप जगताप

जेजुरीचा खंडोबा बहुजनांचा देव आहे , याचे नाव वापरून मांसाहारी सर्टिफिकेट करण्याची काही गरज नाही , मल्हारीचे नाव द्यायचेच असेल एखाद्या वैद्यकीय योजनेला , शेती योजनेला द्या , मल्हारी सर्टिफिकेशनमुळे राज्यातील खंडोबा भक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे , गावात रोष आहे, शासनाने याचा विचार करून तातडीने झटका मटणाला मल्हार नाव देण्याचा निर्णय रद्द करावा. मागील विश्वस्त मंडळाने भव्य हॉस्पिटल उभारण्यासाठी जेजुरीत जागा खरेदी केली आहे मात्र या जागेवर सध्याचे विश्वस्त मंडळ हॉस्पिटलऐवजी भक्तनिवास उभारण्याचा घाट घालीत आहे हे पूर्णतः चुकीचे आहे. जेजुरीमध्ये श्री मार्तंड देवसंस्थानचे भक्तनिवास, लॉज, पुजाऱ्यांची घरे, धर्मशाळा पुरेसे असल्याने भाविकांची राहण्याची चांगली सोय होते .मात्र तालुक्यामध्ये गोरगरीब वर्गासाठी चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा पुरविणारे हॉस्पिटल नाही.परंतु तेथे हॉस्पिटलऐवजी भक्तनिवास उभारण्याचा घाट घातला जात आहे हे पूर्णतः चुकीचे असून आम्ही या गोष्टीला विरोध करणार आहे.