देशातील करोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या पुणे शहरात असून हा आकडा वाढतच आहे. यापार्श्वभूमीवर पुढील तीन दिवसांसाठी पुण्यातील सर्व ज्वेलर्सची दुकानं बंद राहणार आहेत. सराफ व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली.

रांका म्हणाले, “पुण्यात करोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी पुण्यातल्या ८२ विविध व्यापारी संघटनांची शिखर संस्था असलेल्या व्यापारी महासंघाने मंगळवारी सर्व संघटनांची बैठक बोलावली होती. या बैठकीत सर्वप्रकारचा व्यापार बंद ठेवण्याचा एकमुखाने निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, पुणे सराफ असोसिएशनने देखील शहरातील ज्वेलर्सची १९ शोरुम्स आणि लहान-मोठी अकराशे दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. १७, १८, १९ मार्च रोजी तीन दिवस ही दुकानं बंद राहणार आहेत. त्यानंतर गुरुवारी सकाळी पुन्हा बैठक घेऊन पुढील काळात दुकानं बंद ठेवायची की सुरु ठेवायची याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.”

“करोनाचा हा तिसरा आठवडा सुरु होतो आहे. तिसरा आणि चौथा आठवडा संसर्ग वाढीच्या दृष्टीने काळजीचा असून त्यामुळं सावध राहणं हे आपलं काम आहे. सरकार हे रोखण्यासाठी फार मोठ्या प्रयत्न करीत आहे. परंतू, त्याला पाहिजे तसा प्रतिसाद लोक देत नाहीत. त्यामुळेच या संसर्गजन्य आजाराचा प्रभाव पुण्यात वाढू नये म्हणून पुण्यातील सर्व व्यापाऱ्यांनी कर्तव्यभावनेतून व्यापारी महासंघाची बैठक बोलावली होती. विविध व्यापारी संघटनांचे यामध्ये ४५ प्रतिनिधी आले होते. यामध्ये एकमुखाने निर्णय घेणय्त आला की, पुण्यात करोनाचा प्रभाव वाढू द्यायचा नसेल तर दुकानं बंद ठेवली जावीत,” असेही रांका यावेळी म्हणाले.

Story img Loader