हडपसर परिसरातील फुरसुंगी गावाच्या माजी सरपंचाच्या बंगल्यातून सहा लाख ६२ हजार रुपयांचा दागिने चोरट्यांनी चोरल्याची घटना उघडकीस आली आहे.याबाबत संभाजी हरपळे (वय ५९, रा. फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हरपळे फुरसुंगी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आहेत. फुरसुंगी भागातील पांडवदंड रस्त्यावर त्यांचा बंगला आहे.
मध्यरात्री चोरटे स्वयंपाकघरातील दरवाज्याचा कडी-कोयंडा उचकटून आत गेले. चोरट्यांनी कपाट उचकटून सहा लाख ६२ हजार रुपयांचे दागिने चोरले. घरातील ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर हरपळे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे तपास करत आहेत.