लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : महात्मा गांधी रस्ता परिसरात सराफ व्यावसायिकावर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना शनिवारी रात्री घडली. सराफ व्यावसायिकावर झालेल्या हल्ल्यामागचे कारण समजू शकले नाही.
विनय मेहता असे गंभीर जखमी झालेल्या सराफ व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी रात्री उशीरा लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मेहता यांची लष्कर भागातील सेंटर स्ट्रीट परिसरात सराफी पेढी आहे. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास ते सराफी पेढी बंद करुन घरी निघाले होते. त्यावेळी हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्याने वार केले. सेंटर स्ट्रीट परिसरातील सराफ बाजारात सराफ व्यावसायिकावर कोयत्याने वार झाल्याचे समजताच घबराट उडाली.
आणखी वाचा-टाकाऊ रेल्वे डब्यातून साकारले उपाहारगृह
मेहता यांना तातडीने खासगी रुग्णालायत दाखल करण्यात आले. पसार झालेल्या हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तातडीने पोलिसांची पथके रवाना करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.