लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : सराफ व्यावसायिकांना दागिने घडवून देणाऱ्या कारागिराला चोरट्यांनी लुटल्याची घटना रविवार पेठेत घडली. कारागिराशी झटापट करुन तीन लाखांची सोन्याची तार चोरून चोरटे पसार झाले. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याबाबत भरत देवाराम मिना (वय १८, सध्या रा. लक्ष्मी डायिंग कटींग शॉप, रविवार पेठ) याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्य माहितीनुसार, रविवार पेठेत सराफी पेढींना दागिने घडवून देणारे व्यावसायिक आहे. मिना तेथे कारागिर म्हणून काम करतो.

शनिवारी (२६ एप्रिल) सायंकाळी साडेसातच्या सुमारास तो रविवार पेठेतून सायकलवरुन निघाला होता. त्याच्याकडे तीन लाख २२ हजार रुपयांची सोन्याची बारीक तार होती. ही तार तो कारागिर कमल मंडल याला देण्यासाठी निघाला होता. मोती चौक परिसरातील पावटेकर ब्रदर्स अँड सन्स या सराफी पेढीसमोर सायकलस्वार मिना याला चोरट्यांनी अडविले. त्याच्याशी झटापट करुन चोरट्यांनी त्याच्याकडील सोन्याची बारीक तार चोरुन चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक हाळे तपास करत आहेत.

बाजीराव रस्त्यावर ज्येष्ठाचा मोबाइल चोरी

बाजीराव रस्त्यावर सायकलस्वार ज्येष्ठाच्या खिशातील मोबाइल संच चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक तावरे कॉलनीत राहायला आहेत. त्यांचा मुलगा मध्य भागात राहायला आहे. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ते सायकलवरुन बाजीराव रस्त्याने निघाले होते. त्या वेळी चोरट्यांनी त्यांच्या खिशातील मोबाइल संच चोरुन नेला. पोलीस हवालदार नलावडे तपास करत आहेत.

हडपसर भागात एका पादचाऱ्याशी झटापट करुन चोरट्यांनी मोबाइल चोरुन नेल्याची घटना घडली. याप्रकरणी विजय खंडू सरोदे (वय १९, रा. फुरसुंगी, हडपसर) याला अटक करण्यात आली. त्याच्याबरोबर असलेल्या अल्पवयीनाला पोलिसांना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत सूरज रामनिहलानी यादव (वय ४१, रा. राजगे आळी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार कांबळे तपास करत आहेत.

व्यावसायिकाची मोटार चोरी

गुलटेकडी भागात एका व्यावसायिकाने रस्त्याच्या कडेला लावलेली मोटार चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत कमलेशकुमार कांतीलाल शहा (वय ३६, रा. गणेश पॅलेस सोसायटी, गुलटेकडी, क्रिसेंट हायस्कूलजवळ) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शहा यांनी सोसायटीसमोर मोटार लावली होती. चोरट्यांनी मोटार चोरुन नेली. चोरलेल्या मोटारीची किंमत साडेपाच लाख रुपये आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. सहायक फौजदार गुरव तपास करत आहेत.