लोकसत्ता वार्ताहर,

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेजुरी : पुरंदर तालुक्यातील निळूंज या खेडेगावात एका शेतकरी कुटुंबातील महिला स्मिता संतोष जगताप (वय ३५) यांनी चोरांच्या भीतीमुळे घरातील सोन्याचे साडेचार तोळ्याचे दागिने तांदुळाच्या पोत्यात महिन्यापूर्वी लपवून ठेवले होते. त्यानंतर २४ तारखेला गावात दुचाकीवर धान्य खरेदीसाठी आलेल्या एका अनोळखी हात व्यापाऱ्याला ते तांदुळाचे पोते त्यांनी पैशाच्या गरजेपोटी विकून टाकले. यामध्ये २५ किलो तांदूळ होता. तांदुळाचे पोते घेऊन तो व्यापारी गावातून निघून गेला. मात्र चार दिवसांनी आपले दागिने ठेवलेली प्लॅस्टिकची डबी त्या तांदुळाच्या पोत्यात गेल्याचे या महिलेच्या लक्षात आले.

घाबरलेल्या महिलेने सबंध गावात दोन दिवस त्या व्यापाऱ्याचा शोध घेतला. पुन्हा कोणाकडे ते आले होते का याची विचारणा केली. मात्र कुठेच त्यांचा थांगपत्ता लागला नाही. यानंतर ही महिला व तिचा पती दोघेही जेजुरी पोलीस ठाण्यात मंगळवारी(दि .४) आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्यासमोर घडलेला प्रकार सांगताना या महिलेला रडू कोसळले. माझ्या हातून मोठी चूक झाली

आम्ही कष्टकरी आहोत आमच्याकडे आता गुंजभर सोने राहिले नाही. सारं काही गेलं. सोनं गेल्याचे समजल्यापासून माझी झोप हरवली आहे ,जेवले नाही असे या महिलेने काकुळतीला येऊन सांगितले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना धीर दिला आम्ही तुमचे दागिने परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, काळजी करू नका असे सांगितले व घरी पाठवले यानंतर जेजुरी पोलिसांनी निळूंज गावात जाऊन धान्य खरेदीसाठी आलेल्या व्यापाऱ्यांचा काही तपास लागतो का याची माहिती घेतली .मात्र कोणालाच काही सांगता येईना. गावातील ग्रामपंचायतीच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मधील फुटेज तपासणी केली. यावेळी दुचाकीवर दोघेजण धान्य नेताना दिसून आले. मात्र गाडी नंबर ओळखू आला नाही. या गावात पोलिसांनी अधिक चौकशी केली तेव्हा एका महिलेने दुचाकीच्या मागे बसलेल्या व्यक्तीला कुठून आला तसे विचारले असता त्याने बारामती तालुका म्हणले होते. अशी माहिती दिली. या माहितीच्या आधारे या माहितीच्या आधारे पोलिसांनी बारामती तालुक्यातील गावांमध्ये तपास सुरू केला.

बारामती तालुक्यातील मुढाळ या गावांमध्ये धान्य खरेदी करणारे अनेक हातव्यापारी आहेत. त्यांच्याकडे पोलीस पोहोचले. सीसीटीव्ही फुटेज मधून मोबाईलमध्ये त्यांनी दुचाकीस्वाराचा फोटो घेतला होता. हा फोटो अनेक व्यापाऱ्यांना दाखवल्यानंतर एका व्यक्तीने निरा येथील हे व्यापारी असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने नीरा गाठली. संबंधित व्यापाऱ्यांशी संपर्क केला तेव्हा तांदळाचे पोते तसेच गाडीत असल्याचे त्यांनी सांगितले. या टेम्पोमध्ये अनेक गावातून आणलेल्या धान्याची ४० ते ५० पोती भरलेली होती. हा टेम्पो धान्य विकण्यासाठी बाजारात जाणार होता. पोलिसांनी तीन तास सर्व पोती खाली ओतून बघितली तेव्हा एका पोत्यामध्ये दागिन्यांचा डबा सापडला. व्यापाऱ्याचा यात दोष काहीच नव्हता.

पोत्यात दागिने आहेत हे त्यालाही माहीत नव्हते. अखेर पोलिसांनाही आपल्या प्रयत्नाला यश आल्याचा आनंद झाला. संबंधित व्यापाऱ्यांचा टेम्पो धान्य विक्रीसाठी जाणार होता. हे तांदुळाचे पोते विकले गेले असते तर मात्र दागिने परत मिळाले नसते. बारा दिवसांनी महिलेला तिचे दागिने परत मिळाले. या दागिन्यांची किंमत साडेतीन लाख रुपयांच्या पुढे आहे.

पोलिसांचे आभार मानताना महिलेच्या डोळ्यात आले आनंदाश्रू

जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी पोलीस हवालदार संदीप भापकर ,मुनीर मुजावर, घनश्याम चव्हाण यांनी या हरवलेल्या दागिन्यांचा यशस्वी तपास केला. दागिने परत मिळताच स्मिता जगताप यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले.

आम्हाला अगदी तोकडी जमीन आहे. दिवसभर घराला कुलूप लावून आम्ही रानात कामाला जातो. या परिसरात काही भुरट्या चोऱ्या झाल्याने चोरांच्या भीतीमुळे मी आपले सोन्याचे दागिने धान्यात लपवून ठेवले होते. समजा चोरांनी घर फोडले तर त्यांना दागिने सापडू नये हा उद्देश होता. मात्र दुर्दैवाने माझ्याच हातून हे दागिने घराबाहेर गेले. दागिने परत मिळतील याची खात्री नव्हती. जेजुरी पोलिसांच्या मदतीमुळे माझे दागिने परत मिळाले. पोलिसांच्या रूपात देवच आम्हाला पाहायला मिळाला असे सांगत त्यांनी आभार व्यक्त केले.