लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : टिळक रस्त्यावर पीएमपी थांब्यावर ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील अडीच लाख रुपयांचे दागिने हिसकावून चोरटे पसार झाल्याची घटना घडली. शहरात ज्येष्ठ महिलांना चोरट्यांनी ‘लक्ष्य’ केले असून, महिलांकडील ऐवज हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
याबाबत एका ६५ वर्षीय महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार बिबवेवाडी भागात राहायला आहेत. टिळक रस्त्यावरील आयसीआयसीआय बँकेसमोर असलेल्या पीएमपी थांब्यावर त्या शुक्रवारी (११ एप्रिल) रात्री पावणेनऊच्या सुमारास थांबल्या होत्या. त्या वेळी दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील दोन लाख ४६ हजारांचे दागिने हिसकावून नेले. महिलेने आरडाओरडा केला. महिलेला धक्का देऊन चोरटे भरधाव वेगात पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.
पादचाऱ्यांना लुटणे, महिलांकडील दागिने हिसकावून नेण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ‘कॉप्स २४ ’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शहराच्या वेगवेगळ्या भागात गस्त घालण्यात येत आहे. गस्त घालण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. सदाशिव पेठेतील महाराणा प्रताप उद्यान, रविवार पेठ, तसेच गोखलेनगर भागात ज्येष्ठ महिलांचे दागिने हिसकावून नेण्याच्या घटना नुकतीच घडली.
स्वारगेट पीएमपी स्थानकात दागिने चोरी
स्वारगेट पीएमपी स्थानकात चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेच्या हातातील ५० हजारांची सोन्याची बांगडी कापून नेल्याची घटना घडली. याबाबत एका ६५ वर्षीय महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला बोपोडीत राहायला आहेत. त्या शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास स्वारगेट येथील पीएमपी स्थानकात थांबल्या होत्या. त्या वेळी एका बसमध्ये प्रवेश करत असताना चोरट्यांनी महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी कटरचा वापर करुन कापून नेली. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र कस्पटे तपास करत आहेेत. स्वारगेट बस स्थानक परिसरात प्रवासी महिलांकडील दागिने चोरुन नेण्याच्या घटना वाढल्या आहेत.