लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : सदनिकेचे कुलूप चावीने उघडून चोरट्यांनी कपाटातील ५० तोळ्यांचे दागिने, हिरेजडीत दागिने, तसेच चांदीची लगड असा ऐवज चोरुन नेल्याची घटना सॅलिबसबरी पार्कमधील एका सोसायटीत घडली.

याबाबत शीला सुशील जैन (वय ५७, रा. मार्बल हाऊस, सॅलिसबरी पार्क) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शीला जैन यांचे पती सुशील लष्कर भागातील एका खासगी कंपनीत लेखापाल आहेत. त्यांचा मुलगा कर सल्लागार असून, मुलगी शिकवणी चालविते. विवाहात त्यांना माहेरकडून २२ तोळ्यांचे सोन्याचे दागिने देण्यात आले होते. सासरकडून आठ तोळे दागिने देण्यात आले होते. जैन आणि त्यांची मुलगी पूजा नियमित घराजवळ असलेल्या जैन मंदिरात सकाळी ११ वाजता जातात. १८ डिसेंबर रोजी जैन यांचे पती सकाळी नेहमीप्रमाणे कामाला गेले. कुटुंबातील चौघा सदस्यांकडे सदनिकेची चावी आहे. पती दुपारी घरी जेवणासाठी येतात.

आणखी वाचा-बारामतीत तरुणाचा खून करुन पसार झालेले तिघे, गजाआड

पतीकडे असलेली चावी घरात विसरल्याचे लक्षात आल्यानंतर जैन यांनी त्यांच्याकडील चावी सदनिकेच्या बाहेर असलेल्या पादत्राणे ठेवण्याच्या जाळीत (शू रॅक) लपवून ठेवली. जैन आणि त्यांची मुलगी दुपारी कामानिमित्त मुकुंदनगर भागात गेल्या. त्यांनी पतीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून चावी पादत्राणांच्या जाळत ठेवल्याची माहिती दिली. दुपारी तीनच्या सुमारास जैन आणि त्यांची मुलगी काम उरकून घरी आले. पादत्राणांच्या जाळीत ठेवलेल्या चावी त्यांनी घेतली. सदनिकेचा दरवाजा उघडला. तेव्हा शयनगृहातील कपाट उघडून चोरट्याने सोन्याचे दागिने, चांदीची लगड चोरुन नेल्याचे उघड झाले. त्यानंतर त्यांनी या घटनेची पतीला दिली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे यांनी घटनास्तळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र कस्पटे तपास करत आहेत.

आणखी वाचा-दिग्दर्शक आणि कलाकार प्रविण तरडे यांनी गौतमी पाटील यांना ‘फकिरा’ कादंबरी दिली भेट

सीसीटीव्हीत चोरटे

सॅलिसबरी पार्कमधील मार्बल हाऊसमधील सदनिकेत चोरी करणाऱ्या चोरट्याला सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपले आहे. चित्रीकरणात चोरट्यांचा हालचाली दिसून आल्या आहेत. भरदिवसा सदनिकेतून ५० तोळ्यांचे दागिने चोरीला गेल्याने परिसरात घबराट उडाली आहे. घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना पकडण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. यापूर्वी सॅलिसबरी पार्क भागत घरफोडीच्या घटना घडल्या आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jewellery worth 50 tolas stolen from apartment in salisbury park pune print news rbk 25 mrj