लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : मगरपट्टा मेगासेंटरच्या आवारात व्यावसायिकाच्या मोटारीची काच फोडून चोरट्यांनी पाच लाख ३० हजार रुपयांचे दागिने नेण्यात आल्याची घटना घडली.
याबाबत एकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सासवड-हडपसर रस्त्यावरील वडकी नाला भागात राहायला आहेत. त्यांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. ते गुरुवारी दुपारी सव्व्वादोनच्या सुमारास कामानिमित्त मगरपट्टा मेगासेंटरमध्ये आले होते. मेगासेंटरच्या आवारातील वाहनतळावर त्यांनी मोटार लावली होती. मोटारीतील कप्प्यात त्यांनी पाच लाख ३० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने ठेवले होते. काम आटोपून ते पंधरा मिनिटांनी वाहनतळावर आले. तेव्हा मोटारीची काच फोडण्यात आल्याचे लक्षात आले.
चोरट्यांनी मोटारीच्या कप्प्यातून पाच लाख ३० हजारांचे दागिने चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासले असून, पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी तपास करत आहेत.
प्रवासी महिलेकडील तीन लाखांची रोकड चोरी
एसटी प्रवासी महिलेच्या पिशवीतून तीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला मूळच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील पिंपळगाव माळवीच्या रहिवाशी आहेत. त्या कामानिमित्त पुण्यात आल्या होत्या.गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास त्या अहिल्यानगर येथून एसटीतून पुण्याकडे निघाल्या. दुपारी साडेबाराच्या सुमारास त्या मुंबई-पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी स्थानकात उतरल्या. त्यांनी पिशवीची पाहणी केली. तेव्हा पिशवीतून तीन लाखांची रोकड चोरुन नेण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.