पुणे : सराफ बाजारातील कारागिराकडे पत्ता विचारण्याच्या बहाण्याने चोरट्यांनी त्याच्याकडील २० लाखांचे दागिने असलेली पिशवी हिसकावून नेली. रविवार पेठेतील मोती चौक परिसरात ही घटना घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याप्रकरणी दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत चिरनजीत अंबिका बाग (वय २३, सध्या रा. दगडी नागाेबा मंदिराजवळ, रविवार पेठ, मूळ रा. पश्चिम बंगाल) याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चिरनजीत हा एका दागिने घडविणाऱ्या कारागिराकडे कामाला आहे. सराफ बाजारातील सराफांनी सोने दिल्यानंतर त्यांना दागिने घडवून दिले जातात. गुरुवारी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास तो रविवार पेठेतून निघाला होता. त्याच्याकडे १९ लाख ९४ हजारांचे सोन्याचे दागिने होते. दागिने त्याने पिशवीत ठेवले होते.

मोती चौकातील पदपथावरुन तो निघाला होता. पुष्पम ज्वेलर्ससमोर दोघांनी त्याला अडवून पत्ता विचारण्याचा बहाणा केला. चोरट्यांनी त्याला बोलण्यात गुंतविले. त्याचे लक्ष नसल्याची संघी साधून दागिने असलेली पिशवी हिसकावून चोरटे पसार झाले. चरणजितने आरडाओरडा केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी सोन्या मारुती चौक, मोती चौक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रतिक्षा शेंडगे तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jewelry worth 20 lakhs stolen from artisan in jewelry market pune print news rbk 25 amy