प्रेमभंग झाल्याने चिडलेल्या तरुणाने प्रेयसीचे मॉर्फ केलेले आक्षेपार्ह छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रेयसीच्या नावाने इन्स्टाग्रामवर फेक अकाऊंट तयार केले होते. या प्रकरणी हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील पीडित तरुणी ही १८ वर्षांची असून ती हिंजवडीत राहते. तर आरोपी अनिकेत हा गोंदिया येथे राहतो. काही महिन्यांपूर्वी दोघेही सोशल मीडियाद्वारे एकमेकांच्या संपर्कात आले. फेसबुकवर झालेली ओळख वाढली. मोबाइल नंबरची देवाण घेवाणही झाली. आता दोघांच्या दररोज व्हॉट्स अॅपवर गप्पा सुरु झाल्या. या ओळखीचे रुपांतर प्रेमसंबंधांमध्ये झाले. चॅटिंगदरम्यान तरुणीने अनिकेतला फोटो देखील पाठवले होते. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद झाला आणि तरुणीने अनिकेतसोबतचे प्रेमसंबंध तोडले.
तरुणीने ब्रेकअप केल्याने अनिकेत चिडला होता. त्याने तरुणीने पाठवलेल्या फोटोंच्या आधारे तिचे इन्स्टाग्रामवर फेक अकाऊंट तयार केले. या अकाऊंटवर अनिकेत तरुणीचे मॉर्फ केलेले फोटो अपलोड करत होता. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पीडित तरुणीला हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली असून अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.