दत्ता जाधव
पुणे : देशासह जगभरातील पारशी समाजाची लोकसंख्या वेगाने घटू लागल्यानंतर तत्कालीन केंद्र सरकारने २०१३ मध्ये ‘जियो पारशी’ योजना सुरू केली होती. दहा वर्षांनंतरही या योजनेला अपेक्षित यश मिळालेले नाही. या योजनेद्वारे फक्त ३७६ बालकांचा जन्म झाला आहे. समाधानाची बाब म्हणजे या योजनेला कृत्रिम गर्भधारणेच्या तंत्रज्ञानाचा (आयव्हीएफ) मोठा हातभार लागत आहे. ३७६ बालकांपैकी २९० बालकांचा जन्म ‘आयव्हीएफ’ तंत्रज्ञानाच्या मदतीने झाला आहे.
जगभरात पारशी धर्माची लोकसंख्या एक लाखाच्या घरात आहे. २०११च्या जनगणनेनुसार भारतातील पारशींची लोकसंख्या ५७ हजार २६४ इतकी आहे. त्यापैकी फक्त मुंबईतील पारशी नागरिकांची लोकसंख्या ३० हजारांच्या पुढे आहे. भारताशिवाय बांगलादेश, पाकिस्तानातील कराची आणि ऑस्ट्रेलियात पारशी समाजाचे वास्तव्य आहे. देशात लोकसंख्या वेगाने घटत असल्यामुळे केंद्राच्या अल्पसंख्याक खात्याने सप्टेंबर २०१३ मध्ये ‘जियो पारशी’ योजना सुरू केली होती. दहा वर्षांनंतरही या योजनेद्वारे देशभरात फक्त ३७६ बालकांचा जन्म झाला आहे, त्यापैकी २९० बालकांचा जन्म ‘आयव्हीएफ’ तंत्रज्ञानाच्या मदतीने झाला आहे.
या योजनेसाठी समुपदेशक म्हणून काम करणाऱ्या मुंबईतील पर्ल मेस्त्री म्हणाल्या, ‘‘समाजातील एकूण लोकसंख्येपैकी ३० टक्के ज्येष्ठ आहेत. ३० टक्के मुला-मुलींना लग्नच करायचे नाही. त्यामुळे लग्न झालेल्या प्रजननक्षम महिला आणि पुरुषांची संख्या फक्त २० हजारांच्या घरात आहे. मुळात पारशी मुले-मुली लग्न करून संसार करण्याच्या मानसिकतेत नाहीत. साधारण ३२ ते ३५ वयापर्यंत शिक्षण घेऊन चाळिशीपर्यंत ते नोकरी-व्यवसायात स्थिरावतात. त्यानंतर अनेक जण लग्न करण्यास नकार देतात. जे लग्न करतात, त्यांची प्रजनन क्षमता चाळिशीनंतर कमी होते. याचा परिणाम म्हणून जन्मदर अत्यंत कमी आहे. पारशी समाज श्रीमंत असल्याचे वरकरणी दिसत असले तरी गरीब आणि मुले नसलेल्यांची संख्या मोठी आहे. वय उतरणीला लागल्यानंतर आपण लग्न का केले नाही, असा पश्चात्ताप करणारे अनेक जण आहेत.’’
संशोधनाकडे पाठ.. कोलकाता येथील इराण सोसायटी यांनी तेथे नुकतेच एक चर्चासत्र आयोजित केले होते. त्यातून देशभरात पारशी समाज, पारशी संस्कृती आणि पारशी भाषेविषयी संशोधन करण्यासाठी संशोधन संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. मात्र, देशातील संशोधकांनी असे संशोधन करण्याकडे पाठ फिरवली आहे, अशी माहिती पुढे आली आहे. दिल्लीतील पर्शियन रिसर्च सेंटरची अवस्था यापेक्षा वेगळी नाही.
विवाहाबद्दल नकारात्मकता ‘जियो पारशी’ योजने अंतर्गत करोनाकाळात आम्ही मागील ऑनलाइन तसेच प्रत्यक्ष सुमारे शंभर वधू-वर सूचक मेळावे घेतले. त्यातील फक्त अकरा जणांनी लग्न करण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. प्रत्यक्षात आजवर एकही लग्न होऊ शकले नाही, असे पर्ल मेस्त्री यांनी सांगितले.
आम्ही पारशी तरुण-तरुणींची भेट मुले नसलेल्या, लग्न न केलेल्या लोकांशी घालून देतो. त्यांच्या अडचणी समजावून देण्याचा प्रयत्न करतो, तरीही पारशी तरुण-तरुणी लग्न करण्यास तयार होत नाहीत.
– पर्ल मेस्त्री, समुपदेशक जियो पारशी योजना