महाविद्यालयाच्या ग्रंथालयात पुरेशी पुस्तके नाहीत, अभ्यासाच्या तासांना बसण्यासाठीची बाकडी चांगली नाहीत, हॉस्टेलमधील दिवे- पंखे बंद स्थितीत आहेत, शैक्षणिक शुल्कात व्यायामशाळेसाठी भरमसाठ पैसे भरूनही व्यायामशाळा नावाचा प्रकारच नाही..असा प्रश्नांचा पाढाच बी. जे. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वाचला. निमित्त होते नवनियुक्त वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी महाविद्यालयात आयोजित केलेल्या ‘कॉफी विथ स्टुडंट्स’ या कार्यक्रमाचे. विशेष म्हणजे या समस्या ऐकून आव्हाड यांनी, ‘बी. जे. मध्ये इतक्या प्राथमिक पातळीच्या पायाभूत सुविधा नसतील असे वाटले नव्हते. हे धक्कादायक आहे,’ असे म्हणत वारंवार आश्चर्य व्यक्त केले.
महाविद्यालयाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे विद्यार्थी, परिचर्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, वैद्यकीय शिक्षण व संशोधन खात्याचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, ससून रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. डी. जी. कुलकर्णी, खासदार वंदना चव्हाण आदी या वेळी उपस्थित होते.
शिष्यवृत्ती वेळेवर हाती येईल अशी व्यवस्था करा, वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची केंद्रीय मूल्यांकन पद्धत बंद करा, ग्रंथालयातील पुस्तकांची संख्या वाढवा, अभ्यासाला पूरक ठरणाऱ्या आंतरराष्ट्रीय मासिके व पुस्तकांवरील निधी वाढवा, निवासी डॉक्टरांना कामाच्या ठिकाणी सुरक्षितता देण्यासाठी तरतूद करा, विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या बरोबरीने कला आणि सांस्कृतिक गोष्टींसाठी पुरेसा वेळ मिळावा अशी व्यवस्था करा, रुग्णालयातील कँटीन सुधारा, रुग्णालयातील रिक्त जागा भरा अशा विविध मागण्या विद्यार्थ्यांनी या वेळी मांडल्या.
आव्हाड म्हणाले, ‘‘येत्या ४५ ते ६० दिवसांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील सर्व रिक्त पदे भरली जातील. ससूनमध्ये ऑगस्ट महिन्याच्या आत कामगारांचे ‘आऊटसोर्सिग’ केले जाईल. शासकीय महाविद्यालयांसाठी एकसारखी हॉस्टेल बांधण्याचा आमचा प्रयत्न असून प्रत्येक हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांच्या निवडणुका होऊन त्यांचे प्रतिनिधी ठरावेत, या प्रतिनिधींची दर तीन महिन्यांनी अधिष्ठात्यांबरोबर बैठक व्हावी आणि त्यातून विद्यार्थ्यांच्या समस्यांवर तोडगा निघावा अशी योजना आहे. मागासवर्गीय प्रवर्गामधील विद्यार्थ्यांना ८०० कोटी रुपयांच्या शिष्यवृत्ती या वर्षी देण्यात येणार असून आर्थिकदृष्टय़ा दुर्बल स्थितीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ३० कोटी ५० लाखांच्या निधीची तरतूद आहे.’’
वंदना चव्हाण यांनी या वेळी आपल्या खासदार निधीतून बी. जे.च्या विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी एक कोटी रुपये देण्याचे जाहीर केले.
——
—चौकट—
‘तर मलाही अटक करा..’
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केल्याबद्दल केरळमध्ये नऊ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अटक झाल्याप्रकरणी टिप्पणी करताना आव्हाड म्हणाले, ‘‘मी यापूर्वी मोदींवर टीका केली आहे आणि नंतरही करीन. धमक असेल तर मलाही अटक करून दाखवावे. विद्यार्थिदशेत आपले मतप्रदर्शन करणे हा अधिकार असून त्याची गळचेपी करणे योग्य नाही.’’