राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना बुधवारी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारात झालेल्या धक्काबुक्कीप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. फर्ग्युसन महाविद्यालयातील आंबेडकरी विचाराच्या संघटनेच्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी जितेंद्र आव्हाड बुधवारी दुपारी महाविद्यालयात आले होते. त्यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना धक्काबुक्की केली. तिथे जमलेल्या जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना आपल्या पिस्तूलही बाहेर काढाव्या लागल्या होत्या. कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या गाडीचीही तोडफोड केली. या संपूर्ण प्रकरणावरून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

फर्ग्युसन महाविद्यालयात देशविरोधी घोषणा दिल्या आहेत का, याचा तपास करावा, असे पत्र प्राचार्य रविंद्रसिंह परदेशी यांनी पुणे पोलिसांना लिहिले होते. या पत्राचे वृत्त वृत्तवाहिन्यांवर प्रसारित होऊ लागल्यावर लगेचच प्राचार्यांनी त्या पत्रामध्ये टायपिंग करताना चूक झाल्याचे स्पष्टीकरण दिले. देशविरोधी घोषणा दिल्या असल्यास तपास करावा, असे पत्रामध्ये म्हणायचे होते. पण टाईप करताना ‘असल्यास’ शब्द राहून गेल्यामुळे त्या वाक्याचा अर्थ बदलला असल्याचे परदेशी यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले.
या पत्राचे पडसाद बुधवारी विधानभवनामध्येही उमटले. विरोधकांनी प्राचार्यांना निलंबित करण्याची मागणी केली. आंबेडकरी विचारांच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी जितेंद्र आव्हाड महाविद्यालयाच्या आवारात आल्यानंतर तणावात काहीशी वाढ झाली. ‘जितेंद्र आव्हाड चले जाव’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. आव्हाड यांना धक्काबुक्कीही करण्यात आली. दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना शांत केले आणि आवारातून बाहेर काढले होते.