राज्य औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) पिंपरी महापालिकेला अंधारात ठेवून परस्पर ‘उद्योग’ केला असून एका औद्योगिक संस्थेला साडेचार एकरचा भूखंड परस्पर विकला आहे, अशी तक्रार राष्ट्रवादीचे नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्यास बऱ्याच गोष्टी बाहेर येतील, असे ननावरे यांनी म्हटले आहे.
पिंपरीलगत महात्मा फुलेनगर येथे असलेली ही जागा मैदानासाठी उपलब्ध करून द्यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ननावरे यांनी निवेदनात दिला आहे. या जागेसाठी आपले सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. पालिकेच्या विकास आराखडय़ात या जागेवर एसटीचे आरक्षण आहे. पालिकेने महामंडळाकडे याविषयी विचारणा केली, तेव्हा एमआयडीसीने ६० लाख रुपये देऊन ही जागा आमच्याकडून पुन्हा ताब्यात घेतल्याचे त्यांनी कळवले. त्यानंतर महापालिकेने एमआयडीसीला मैदानाच्या जागेच्या मागणीचे पत्र दिले. तथापि, जागा हवी असल्यास औद्योगिक दराप्रमाणे महापालिकेने पैसे भरावेत, असे प्रत्युत्तर एमआयडीसीने दिले. या जागेवर औद्योगिक किंवा व्यापारी वापर करता येणार नसल्याचे सांगत मैदानी वापर होणाऱ्या या जागेसाठी नाममात्र दर निश्चित करावेत व ही जागा पालिकेला हस्तांतरित करावी, अशी मागणी पालिकेने केली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. दरम्यान, महापालिकेला अंधारात ठेवून एमआयडीसीने हा भूखंड औद्योगिक संस्थेस विकून टाकला असल्याची बाब अलीकडे उजेडात आली आहे. त्यामुळे हे प्रकरण दिसते तसे नाही, अशी शंका ननावरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली आहे.
महात्मा फुलेनगर, वल्लभनगर, संत तुकारामनगर येथील मुलांना खेळण्यासाठी मैदान राहणार नाही. या ठिकाणी राहणाऱ्या कामगारांच्या जीवावर कंपन्या चालतात. याच कामगारांच्या मुलासाठी भूखंड उपलब्ध करून दिला जात नाही. एमआयडीसीने मैदानासाठी हा भूखंड पालिकेला तातडीने हस्तांतरित करावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ननावरे यांनी दिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा