पुणे : ख्रिश्चन धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी पुणे धर्मप्रांताचे बिशप जॉन रॉड्रिग्स यांची मुंबई सरधर्म प्रांताचे कोअॅडजुटेर (वारसाधिकारी) बिशप म्हणून नियुक्ती केली आहे. व्हॅटिकनच्या कॅनन कायद्यानुसार बिशप रॉड्रिग्स यांना मुंबई सरधर्मप्रांताचे विद्यमान आर्चबिशप ओस्वाल्ड ग्रेशियस यांचे वारस नेमण्यात आले आहे.
रोममधील व्हॅटिकन सिटीमध्ये याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. वारसाधिकारी बिशप म्हणून रॉड्रिग्स २५ जानेवारी रोजी मुंबईत सूत्रे हाती घेतील. कॅथोलिक चर्चच्या बिशपांचे निवृत्तीचे वय ७५ आणि कार्डिनल यांचे निवृत्तीचे वय ८० वर्षे असते. कार्डिनल ग्रेशियस निवृत्त होतील तेव्हा त्यांचे वारस म्हणून आर्चबिशप हे पद रॉड्रिग्स स्वीकारतील. मुंबईचे कार्डिनल ओस्वाल्ड ग्रेशियस हे जगभरातील कार्डिनल्सपैकी एक सर्वाधिक ज्येष्ठ असून, पोप फ्रान्सिस यांचे एक महत्त्वाचे सल्लागार आहेत.
हेही वाचा >>>पुणे : महिला पोलिसांमुळे महिलेची सुखरूप प्रसूती; अचानक पोट दुखायला लागलं अन… नेमकं काय घडलं?
बिशप जॉन रॉड्रिग्स यांची दीड वर्षांपूर्वीच मार्च २०२३ मध्ये पुणे धर्मप्रांताचे बिशप म्हणून नेमणूक झाली होती. मुंबईचे कार्डिनल ओस्वाल्ड ग्रेशियस हे भारतातील कॅथॉलिक चर्चचे सर्वात ज्येष्ठ धर्माधिकारी, भारतातील सहा कार्डिनल्सपैकी एक आणि जागतिक चर्चमध्ये पोप फ्रान्सिस यांचे एक महत्त्वाचे सल्लागार आहेत. पुणे धर्मप्रांताचे व्हिकर जनरल फादर रॉक अल्फान्सो यांनी पुणे धर्मप्रांतातील लोकांच्या वतीने नवनिर्वाचित कोअॅडजुटेर बिशप रॉड्रिग्स यांचे अभिनंदन केले आहे.