प्रसिद्ध कॉमेडियन जॉनी लिवर यांनी “दाक्षिणात्य चित्रपट उद्योगाने बॉलिवूडला मागे टाकले”, असं मत व्यक्त केलं. तसेच यामागील कारणंही सांगितली. यावेळी त्यांनी ९० च्या दशकातील कॉमेडी आणि आजची स्थिती यावरही भाष्य केलं. याशिवाय व्यक्तिगत आयुष्यातील काही किस्सेही सांगितले. ते पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बोलत होते.
जॉनी लिवर म्हणाले, “मी १९७७ मध्ये पूर्णवेळ कॉमेडी करण्यासाठी नोकरी सोडली. कारण, लोकांनी माझ्यात प्रतिभा आहे असं सांगितलं. ९० च्या दशकात बनवलेल्या ९० टक्के चित्रपटांमध्ये माझी कॉमेडी भूमिका होती. माझ्यावर कर्ज असतानाही मी कॉमेडी करणं कधीच थांबवलं नाही. कारण मला माझ्या अभिनयातून प्रेक्षकांना हसवण्यात आनंद वाटत होता.”
“गेल्या काही वर्षांत कॉमेडी खूप बदलली”
“गेल्या काही वर्षांत कॉमेडी खूप बदलली आहे. याआधी लेखकाला चित्रपटाची कथा लिहिण्यासाठी आणि त्यावर काम करण्यासाठी वर्षभर बंगल्यात ठेवलं जायचं. त्यामुळे त्यावेळी लेखक शक्य तितकं परिपूर्णतेच्या जवळ जाणारं काम करायचे,” असं मत जॉनी लिवर यांनी व्यक्त केलं.
“त्यामुळेच दाक्षिणात्य चित्रपट उद्योगांने बॉलिवूडला मागे टाकले”
जॉनी लिवर पुढे म्हणाले, “सध्या कोणाकडेच तेवढा वेळ नाही. त्यामुळे आज लेखकाला त्यांचे घर चालवण्यासाठी एकाचवेळी जवळपास १० प्रकल्पांवर काम करावं लागतं. या सर्व हलगर्जीपणामुळेच दाक्षिणात्य चित्रपट उद्योगांने बॉलिवूडला मागे टाकले आहे.”
हेही वाचा : राखी सावंतने नवऱ्यावर केलेल्या आरोपांबाबत आदिल खानच्या वकिलांचा मोठा खुलासा, म्हणाले, “प्लॅन करुन…”
“केवळ विचित्र कपडे घालून आणि असभ्य वागून कॉमेडी न करता मेहनत घेऊन चांगली स्क्रिप्ट लिहिली पाहिजे,” असंही त्यांनी नमूद केलं.