दिल्लीतील ‘जेएनयू’ मधील विद्यार्थी नेता कन्हैया याच्यावर नागपूर येथे झालेला चप्पल फेकण्याचा प्रकार अतिशय चुकीचा असल्याचे सांगत यातून चप्पल फेकणाऱ्यांची केविलवाणी प्रवृत्ती दिसून येते, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी िपपरीत केली. ‘भारत माता की जय’वरून सरकार राजकारण करत असल्याचे सांगत अजितदादांनी मुख्यमंत्र्यांवरही टीकास्त्र सोडले.
िपपरी पालिका आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचा समारोप अजितदादांच्या उपस्थितीत झाला, तेव्हा ते बोलत होते. महापौर शकुंतला धराडे, आयुक्त राजीव जाधव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, उपमहापौर प्रभाकर वाघेरे, स्थायी समितीचे अध्यक्ष डब्बू आसवानी, माजी महापौर योगेश बहल, राष्ट्रवादीच्या महिलाध्यक्षा सुजाता पालांडे आदी उपस्थित होते. िपपरीतील बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अजितदादांनी त्यांना अभिवादन केले.
सभेत पवार म्हणाले, नागपूर येथे कन्हैयावर चप्पलफेक करण्यात आली, हा प्रकार चुकीचा आहे. विचार पटत नसतील तर तुम्ही असे करणार का? विचारांची लढाई विचारांनी व्हायला हवी. योग्य काय ते जनता ठरवेल. बाबासाहेबांनी घटनेद्वारे सर्वाना समान अधिकार दिला आहे. कन्हैया विद्यार्थ्यांपुढे विचार मांडण्यासाठी आला होता, त्याला चप्पल मारण्यात आली, ही प्रवृत्ती केविलवाणी आहे. आता तो पुण्यातही येणार आहे, असे ते म्हणाले. ‘भारत माता की जय’ वरून सरकार राजकारण करत असल्याचा पुनरुच्चार करून पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. ‘भारत माता की जय’ म्हणणार, पद सोडावे लागले तरी चालेल, असे विधान मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी केले होते. त्याचा संदर्भ देत पवार म्हणाले की, पद सोडा असे कोणी सांगितले नाही. तरीही जाणीवपूर्वक ही चर्चा ते करत आहेत. महाराष्ट्रात दुष्काळ, पाणीटंचाईसारखे विषय असताना नागरिकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हे राजकारण सुरू असल्याची टीका पवार यांनी केली. प्रास्ताविक गोरक्ष लोखंडे यांनी केले. अण्णा बोदडे यांनी सूत्रसंचालन केले. बाबा कांबळे यांनी आभार मानले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा