पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा त्रास केवळ नगर रस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांनाच नव्हे तर त्या रस्त्याने पुण्यातून बाहेर पडणाऱ्या आणि आतमध्ये येणाऱ्या वाहनचालकांनाही मोठ्या प्रमाणात होत आहे. या रस्त्यावरील कोंडी सोडवण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने एकत्रित सर्वेक्षण केले. त्यानुसार अनेक ठिकाणी सुधारणा करण्यात येणार आहेत.
हेही वाचा >>> पुणे: भेंडी, गवार झाली स्वस्त, अन्य फळभाज्यांचे दर स्थिर
पुणे-नगर रस्ता वाहतूक कोंडीसोबतच अपघातांचे प्रमाण वाढत आहे. लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्राणांतिक अपघातांची संख्या जास्त आहे. नगर रस्त्याची क्षमता ५० हजार पॅसेंजर कार युनिट (पीसीयू) आहे. प्रत्यक्षात ही क्षमता ७५ हजार पीसीयूपर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच या रस्त्यावरून क्षमतेच्या दीडपट वाहने जात आहेत. त्यातच या रस्त्याभोवतीचे अतिक्रमण आणि वाहनचालकांच्या बेशिस्तीमुळे कोंडी वाढून अपघातांमध्ये वाढ होत आहे.
हेही वाचा >>> पुणे: राज्यातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; सीआयएससीईचा दहावी, बारावीचा निकाल जाहीर
नगर रस्त्यांवरील वाहतुकीचे सर्वेक्षण सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत भोसले आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या सर्वेक्षणात रस्त्यावरील अनेक समस्या समोर आल्या आहेत. त्यांची तातडीच्या आणि दीर्घकालीन अशी वर्गवारी करण्यात आली आहे. तातडीच्या उपाययोजना लगेच सुरू करण्यासाठी संबंधित यंत्रणांकडे आरटीओकडून पाठपुरावा केला जाणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए), पुणे महापालिका, वाहतूक पोलीस यांच्यासोबत समन्वय साधून या उपाययोजना केल्या जातील.
नेमक्या सुधारणा काय?
– नगर रस्त्यावर सेवा रस्ताच नसल्याने गावांच्या हद्दीत महामार्गालगत लोखंडी रेलिंग उभारणे.
– वाघोलीच्या पुढे सध्या सिग्नल नसून अनेक चौकांमध्ये सिग्नल बसवणे.
– खडीची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून, खडी रस्त्यांवर सांडून अपघात होत आहेत. अशा वाहनांवर कारवाई करणे.
– पीएमपी थांब्यावर निश्चित ठिकाणीच बस थांबवाव्यात, यासाठी पीएमपीएमएलला सूचना.
– नियम मोडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असल्याने त्यांच्यावर कारवाईची वाहतूक पोलिसांना सूचना.
– वाघोलीच्या पुढे भरधाव वाहनांवर कारवाई करण्यासाठी स्पीडगन बसवणे. – रांजणगाव एमआयडीसीबाहेर रस्त्यावरच बस थांबत असल्याने कोंडी होत असल्याने रस्त्याच्या बाजूला थांबा उभारणे.