पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पर्यायी रस्त्याचे (मिसिंग लिंक) काम अंतिम टप्प्यात आले आहे. वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे कामात अडथळे येत असले, तरी काम सुरू ठेवण्यात आले असून, येत्या जूनपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचा अंदाज महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला. या पर्यायी रस्त्यामुळे मुंबई-पुणे प्रवास १३.३ किलोमीटरने अंतराने कमी होणार आहे.
लोणावळा येथे द्रुतगती मार्ग व मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे खालापूर टोल प्लाझाजवळ एकत्र येतात आणि पुढे खंडाळा एक्झिट येथे वेगळे होतात. आडोशी बोगदा ते खंडाळा एक्झिट हा रस्ता सहा पदरी असून, या भागात १० पदरी वाहतूक येऊन मिळते. या भागामध्ये घाट व चढ-उताराचे प्रमाण जास्त आहे. दरडी कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात वारंवार होत असतात. त्यामुळे मुंबईकडे येणारा डोंगरालगतचा एक मार्ग पावसाळ्यात बंद ठेवावा लागतो. या पार्श्वभूमीवर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील १३.३ किलोमीटर लांबीच्या पर्यायी रस्त्याचे काम एमएसआरडीसीकडून हाती घेण्यात आले.
या पर्यायी रस्त्यावरील लोणावळा येथून जाणाऱ्या खोपोली एक्झिटपासून ते सिंहगड इस्टिट्यूटपर्यंत असणाऱ्या १९.८ किलोमीटर अंतराच्या बोगद्यांचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. या भागात डोंगरभाग मोठ्या प्रमाणात असून १३० मीटर उंचीच्या केबल पुलावर काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू आहे. पावसाळ्यात या ठिकाणचे काम पूर्णत: बंद करावे लागते. त्यामुळे यंदा पावसाळ्यापूर्वी पर्यायी रस्त्याचे काम पूर्ण करण्याचा मानस आहे. त्यानुसार जून महिन्यात काम पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
बदलते हवामान, वारा, वादळ असल्याने उंचावर काम करताना अडथळे येतात. मात्र, काम सुरू ठेवण्यात आले आहे. पावसाळ्यात पूर्णत: काम बंद ठेवावे लागते. जून महिन्याच्या आत काम पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करण्याचा मानस आहे. – राहुल वसईकर, अधीक्षक अभियंता, एमएसआरडीसी