जात ही कधीही जात नाही. जात लपवायची नाही आणि जात पाळायचीही नाही. जन्मभर जातीला चिकटून राहत जातीचा अभिमान बाळगण्यापेक्षा विवेकाने जगणे महत्त्वाचे आहे. माणसावर विवेकशीलतेचे संस्कार पत्रकारितेतून घडावेत, अशी अपेक्षा साहित्य संमेलनाध्यक्ष प्रा. फ. मुं. शिंदे यांनी रविवारी व्यक्त केली.
पत्रकार वरूणराज भिडे मित्र मंडळातर्फे ज्येष्ठ पत्रकार आणि ‘लोकसत्ता’चे रत्नागिरी येथील विशेष प्रतिनिधी सतीश कामत यांना यंदाचा वरूणराज भिडे पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्या प्रसंगी शिंदे बोलत होते. ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार अध्यक्षस्थानी होते. बीड येथील ‘प्रजापत्र’चे संपादक सुनील क्षीरसागर, ‘केसरी’च्या प्रतिनिधी नम्रता फडणीस आणि ‘आयबीएन लोकमत’च्या नाशिक येथील प्रतिनिधी दीप्ती राऊत यांना आश्वासक पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान पुणे केंद्रातर्फे पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमाच्या स्वाती बोबडे आणि अनिल तांबे यांना वरुणराज भिडे पुरस्कार प्रदान करण्यात आला. उल्हास पवार, अंकुश काकडे आणि डॉ. सतीश देसाई हे मित्र मंडळाचे विश्वस्त या वेळी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, वरुणराज भिडे यांची प्रत्यक्ष भेट होण्याचा योग कधी आला नाही. मात्र, त्यांच्या लेखनातील चित्रमयता आणि चैतन्यशीलता याचा अभ्यास प्रत्येक पत्रकाराने केला पाहिजे. पत्रकार हे आपल्या लेखनातून सातत्याने सत्य आणि सौंदर्याची अभिव्यक्ती करतात. सध्याच्या काळातील पत्रकारांनी वस्तुनिष्ठ आणि शोधक वृत्तीने लेखन करण्याची आवश्यकता आहे.
वरुणराज भिडे हे माझे मित्र होते. उमेदवारीच्या काळातील माझे शिक्षकही होते. त्यामुळे या पुरस्काराशी माझे एक वेगळे भावनिक नाते असल्याचे सतीश कामत यांनी सांगितले. सध्या तंत्रज्ञानाचा स्फोट झाला आहे. वृत्तपत्राकडे उद्योग आणि उत्पादन म्हणून पाहिले जात असताना पत्रकारिता बाजारपेठ शरण झाली आहे. मात्र, तंत्रज्ञानाच्या स्फोटाबरोबरच संधी देखील वाढल्या आहेत.
सामान्य माणसाच्या हातून चूक झाल्यावर गुन्हा दाखल होतो. मग, मतदारयादीतून नावे वगळणाऱ्यांना अटक का होत नाही, असा सवाल प्रतापराव पवार यांनी केला. केवळ माफी मागून प्रश्न मिटणार नाही. तर, या चुकांसाठी दोषी असलेल्यांवर कारवाईचा नैतिक अधिकार समाजाने बजावला पाहिजे. त्याचबरोबरीने माध्यमांनी आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा जबाबदारीने वापर केला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
सूर्यकांत पाठक यांनी सूत्रसंचालन केले. शैलेश गुजर यांनी आभार मानले.

Story img Loader