‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या परप्रांतिय प्रेयसीचा खून केल्याच्या आरोपावरून भोसरीतील संकेतस्थळाच्या पत्रकारास अटक करण्यात आली आहे. सुमारे तीन महिन्यानंतर खुनाचा प्रकार उघड झाला आहे. रामदास पोपट तांबे (वय-३०, रा. दिघी रस्ता, भोसरी. मूळ राहणार, अहमदनगर) असे या पत्रकाराचे नाव आहे. चंद्रमा सिमांचल मुनी (वय-२८, मूळ राहणार, ओडिशा) असे मयत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा- पुणे: सासरच्या छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास आणि चंद्रमा भोसरीत एकत्र राहत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होते. काही कारणास्तव चंद्रमा ही रामदासला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत होती. तिच्या सततच्या त्रासाला कंटाळून रामदासने तिला जीवे मारण्याचा कट रचला. ३ ऑगस्टला चंद्रमाचा गळा आवळून खून करून तिचा मृतदेह खेड तालुक्यातील केळगाव येथे नदीपात्रात टाकून दिला. याप्रकरणी रामदासच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याने खुनाची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. भोसरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव पुढील तपास करत आहेत.