मराठी पत्रकारितेचे जनक ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकारितेतील कार्याची प्रेरणा नव्या पिढीच्या पत्रकारांनी घ्यावी, अशी अपेक्षा केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केली.
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात शरद पवार यांच्या हस्ते पंढरीनाथ सावंत, उत्तम कांबळे, मधुकर भावे, राजाभाऊ लिमये, सुधाकर डोईफोडे, प्रतापसिंह जाधव, चंदूलाल शहा, सुधीर गाडगीळ या ज्येष्ठ पत्रकारांना दर्पण जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. वनमंत्री डॉ. पतंगराव कदम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जलसंपदामंत्री सुनील तटकरे, महापौर वैशाली बनकर, सुभाष शिंदे, संस्थेचे संस्थापक रवींद्र बेडकीहाळ, विश्वस्त विजय मांडके याप्रसंगी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, बाळशास्त्री जांभेकर यांनी एका विचारधारेतून वृत्तपत्र सुरू केले. समाजातील अनिष्ट प्रथा नाहीशा होऊन चांगल्या गोष्टींची जोपासना व्हावी या उद्देशातून त्यांनी सातत्याने लेखन केले. महिलांच्या अधिकारांबाबत त्यांचे लेखन आजही विचारप्रवर्तक आहे.
डॉ. पतंगराव कदम म्हणाले, सत्यता न पडताळता एखादी घटना वाहिन्यांवर दिवसभर दाखविली जाते. बलात्काराच्या बातम्या वारंवार दाखविल्याने हे राज्य बलात्कारी लोकांचेच आहे की काय अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. त्यामुळे पत्रकारितेची विश्वासार्हता किती राहिली आहे याचे आत्मचिंतन करण्याची गरज आहे. दुष्काळासह राज्यातील अन्य समस्यांविषयी जागरुकता घडवून विधायक पत्रकारितेसाठी प्रयत्न झाले पाहिजेत.
याप्रसंगी उत्तम कांबळे, मधुकर भावे, राजाभाऊ लिमये यांनी मनोगत व्यक्त केले. रवींद्र बेडकीहाळ यांनी प्रास्ताविक केले. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले.
…….
चौकट
मी डॉक्टर नाही
कार्यक्रमपत्रिकेमध्ये शरद पवार यांच्या नावापूर्वी ‘डॉक्टर’ असे लिहिण्यात आले होते. त्याचा संदर्भ देत शरद पवार म्हणाले, मला राज्यातील, देशातील आणि परदेशातील काही विद्यापीठांनी डी.लिट दिली आहे. तो मला मिळालेला सन्मान आहे. त्याचा आदर राखला पाहिजे. पण, डी. लिट आणि पीएच. डी. यामध्ये फरक आहे. पतंगराव कदम यांनी अभ्यास करून पीएच. डी. संपादन केली असल्यामुळे त्यांच्या नावापूर्वी डॉक्टर लिहिणे योग्य आहे. पण, मी पीएच. डी. केली नसल्यामुळे कृपया मला ही पदवी लावू नये.
 .