गृहरक्षक दल अर्थात होमगार्डचे जवान म्हणून काही वर्षे काम केल्यानंतर ‘त्या’ दोघांना पोलीस यंत्रणेची आणि त्यांच्या कामकाजाची जवळून ओळख झाली.. त्याचा गैरफायदा घेत त्यांनी छोटय़ा-मोठय़ा चोऱ्या करण्यास सुरुवात केली.. हे गुन्हे उघडकीस न आल्याने त्यांची भीड चेपली.. पैसाही मिळत गेल्याने ते यातच ‘रमले’.. एकेक गुन्हे करता करता ते सराईत चोर बनले, लुबाडणुकीचे प्रकारसुद्धा करू लागले.. त्यांचा ‘होमगार्ड ते अट्टल चोर’ हा प्रवास गेल्या तीन वर्षांत झाला.. अखेर ते पोलिसांच्या जाळ्यात सापडले आणि या दोघांचा प्रवास पोलिसांच्या कोठडीपर्यंत पोहोचला.
त्यांनी गेल्या वर्षभरात दुचाकी वाहनांवरून जाणाऱ्या तब्बल ४४ जणांना धमकावत लुटल्याचे उघडकीस आले आहे. या पैशातून त्यांनी मौजमजा तर केलीच आणि सदनिकासुद्धा खरेदी केल्याचे उघडकीस आले आहे.
मयूर रवींद्र वाघमारे (वय २३, रा. यशोदीप सोसायटी, वारजे माळवाडी), दीपेश यशवंत शिर्के (वय २४, रा. जांभूळवाडी, कात्रज) अशी या दोघांची नावे आहेत. पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या पथकाने त्यांना अटक केली आणि त्यांचा खरा चेहरा उघड झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघमारे आणि शिर्के हे दोघेजण होमगार्डमध्ये जवान होते. त्यांना बंदोबस्तासाठी वारजे माळवाडी हा परिसर मिळत होता. त्यामुळे त्यांना या परिसराची संपूर्ण माहिती झाली. होमगार्डचे जवान म्हणून प्रत्यक्ष डय़ूटीवर नसताना या दोघांनी गुन्हे करायला सुरुवात केली. ते रस्त्याच्या कडेला असलेल्या मद्यपान करून पडलेल्यांच्या खिशातील पैसे काढून घेत. पोलीस असल्याचे सांगत त्यांना दमदाटी करायचे. हे गुन्हे केल्यानंतरही काही कारवाई होत नसल्याचे आणि गुन्हे पचत असल्याचे दिसल्यावर त्यांचे धाडस वाढले. त्यानंतर त्यांनी वेगळी पद्धत अवलंबली. ते दुचाकीस्वारांना अडवायचे आणि त्यांच्याशी विविध कारणावरून भांडण काढत त्यांना लुटायचे. ‘गाडी वाकडी-तिकडी का चालवतोस? आम्ही पडलो असतो, तू आमच्या अंगावर का थुंकलास?, मागे बघून थुंकता येत नाही का?, तू आम्हास कट का मारलास?, ओव्हरटेक का केलेस? मोटारसायकल चालविताना मोबाईलवर का बोलतोस?, रागाने का पाहतोस? अशी अनेक कारणे सांगून त्यांनी भररस्त्यावर नागरिकांना लुटण्यास सुरुवात केली.
त्यांनी अशा प्रकारे आतापर्यंत ४४ जणांना लुटल्याचे तपासात पुढे आले आहे. या चोरीसाठी त्यांनी लाल आणि काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलचा वापर केला गेला. त्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अजय वाघमारे हे अधिक तपास करीत आहेत.
 
चोरीच्या पैशातून मौजमजा आणि सदनिका
होमगार्डचे जवान म्हणून काम करताना वाघमारे व शिर्के यांना पोलिसांच्या कार्यपद्धतीची खडान् खडा माहिती झाली. पोलिसांची डय़ूटी रात्री नऊच्या सुमारास बदलते आणि पोलीस साधारण मध्यरात्री बाराच्या सुमारास गस्त घालण्यास सुरुवात करतात, ही माहिती त्यांना मिळाली. मग त्यांनी रात्री नऊ ते बारा या वेळेत दुचाकीस्वारांना लुटणे सुरू केले. यातून पैसा मिळाला की हे आरोपी आठवडय़ातून एकदा पनवेल परिसरातील लेडिज बारमध्ये जाऊन यायचे. त्याचबरोबर यातील एका आरोपीने चोरीच्या पैशातून एक सदनिका खरेदी केली असून, ती जप्त करण्याच्या हालचाली पोलिसांकडून सुरू आहेत.

Story img Loader