पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची चौथी फेरी मंगळवारपासून सुरू झाली असून या फेरीसाठी साधारण १९ हजार जागा उपलब्ध आहेत.
पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया या वर्षी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या तिन्ही फे ऱ्यांमधून ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता आलेला नाही, त्यांच्यासाठी ऑफलाइन पद्धतीने चौथी प्रवेश फेरी घेण्यात येत आहे. या फेरीत १७ जुलैपर्यंत महाविद्यालयांमध्ये अर्ज विक्री करण्यात येणार आहे. त्यानंतर २१ जुलैला गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे, तर २२ ते २४ जुलै दरम्यान गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देण्यात येणार आहेत. अकरावीला प्रवेश घेण्यासाठी ही शेवटची संधी असणार आहे. या वर्षी अकरावीच्या एकूण ६७ हजार ६६५ जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या तीन फेऱ्यांमधून साधारण ४८ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकला आहे. चौथ्या फेरीसाठी साधारण १९ हजार जागा उपलब्ध असून महाविद्यालयांनी गुणवत्तेनुसारच प्रवेश प्रक्रिया राबवावी, असे केंद्रीय प्रवेश समितीकडून सांगण्यात आले आहे.
ऑनलाइन प्रवेश पद्धतीमध्ये सहभागी होऊनही ३ हजार ४०० विद्यार्थ्यांना एकाही महाविद्यालयात प्रवेश मिळालेला नाही. या विद्यार्थ्यांना कमी गुण असताना, त्यांनी जास्त कट ऑफ असलेल्या महाविद्यालयांचे पर्याय दिल्यामुळे त्यांना प्रवेश मिळू शकलेला नाही, असे अकरावी केंद्रीय प्रवेश समितीकडून सांगण्यात आले आहे. मात्र, प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची आणि बाहेरून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया स्वतंत्रपणे करण्याची मागणी संघटनांकडून करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे चौथी फेरी महाविद्यालयीन स्तरावर राबवण्यासाठीही विद्यार्थी संघटनांनी विरोध केला आहे. चौथी प्रवेश फेरी केंद्रीय पद्धतीने न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.                                                                    

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नावाजलेल्या महाविद्यालयांमध्येही जागा रिक्त
पुण्यातील नावाजलेल्या फग्र्युसन, स.प महाविद्यालय, गरवारे महाविद्यालय अशांसारख्या महाविद्यालयांमध्येही तिसऱ्या फेरीअखेर जागा रिक्त आहेत. रिक्त असणाऱ्या जागांध्ये विनाअनुदानित वर्गाचे प्रमाण जास्त आहे. चौथ्या प्रवेश फेरीसाठी उपलब्ध असेलेल्या रिक्त जागांची महाविद्यालयानुसार माहिती pune.fyjc.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jr colleges admission off line 4th round