शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अद्यापही २३ हजार ३८८ जागा रिक्त आहेत. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी २७ जुलैची मुदत देण्यात आली आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यंदा राज्यातील ९ हजार ८६ शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या १ लाख १ हजार ९०६ जागांसाठी २ लाख ८२ हजार ७८३ विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज दाखल झाले. त्यातील नियमित आणि प्रतीक्षा यादी मिळून १ लाख २३ हजार ९५१ विद्यार्थ्यांना सोडतीमध्ये प्रवेश जाहीर झाला. सोडतीमध्ये प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र अद्यापही २३ हजार ३८८ जागा रिक्त आहेत. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी २७ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी दिली.