पुणे : शहरातील धकाधकीच्या आयुष्यात घर आणि नोकरी अशी तारेवरची कसरत सांभाळणाऱ्या महिलांना थोडा विरंगुळा मिळावा, हा विरंगुळा त्यांना सभोवतालच्या निसर्ग, पर्यावरण आणि वनांशी जोडलं जाण्यासाठी वापरता यावा या विचारातून काही महिलांनी पुढाकार घेतला आणि ‘जंगल बेल्स’ ची सुरुवात झाली. महिलांनी, महिलांना निसर्गाशी जोडण्यासाठी सुरू केलेला बहुदा हा एकमेव उपक्रम आहे.
दोन ते आठ ऑक्टोबर हा आठवडा वन्यजीव सप्ताह म्हणून साजरा केला जातो. निसर्गाच्या सान्निध्यात जाणे, जंगलातील शांतता अनुभवणे, घर आणि कार्यालयीन जबाबदाऱ्या आणि शहरातील धकाधकीपासून दूर मोकळा श्वास घेणे आणि त्या बरोबरीने वन संवर्धनाची गरज, त्यासाठी योगदान देण्याचे पर्याय अशा अनेक पद्धतीने ‘जंगल बेल्स’ चे उपक्रम महिलांसाठी उपयुक्त ठरत आहेत. हेमांगी वर्तक आणि आरती कर्वे यांच्या पुढाकाराने जंगल बेल्स सुरू झाले. संजय देशपांडे यांचे या उपक्रमाला मार्गदर्शन मिळत आहे.
‘जंगल बेल्स’च्या संस्थापक हेमांगी वर्तक सांगतात,की मी पहिल्यांदा कान्हाच्या जंगलात गेले तेव्हा तेथील शांतता अनुभवली. निसर्गाशी जोडले जाण्याचा अनुभव म्हणजे काय याची जाणीव मला त्या जंगल भेटीत झाली. मोबाइल, समाज माध्यमांतून सतत सगळ्यांच्या संपर्कात राहणे, नोकरी उद्योगातील ताणतणाव या आपल्या रोजच्या जगण्यातील अनिवार्य गोष्टी ठरत आहेत. जंगलात ‘नेटवर्क’ नसल्यामुळे आपोआप ‘डिजिटल डिटॉक्स’ होते. शहरात परत येऊन कामाला लागण्याची ऊर्जाही जंगल देते. हा अनुभव आपल्यासारखाच इतर शहरी महिलांना मिळावा म्हणून ‘जंगल बेल्स’ सुरू केले. १८ ते ७२ वर्ष वयोगटातील कित्येक महिलांनी आमच्याबरोबर जंगलाशी जोडले जाण्याचा अनुभव घेतला आहे.
दरवर्षी फक्त महिलांसाठी वन्यजीव छायाचित्र स्पर्धा आम्ही घेतो. जंगल राखण्यात योगदान देणाऱ्यांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम घेतो. त्याचा भाग म्हणून भिगवण सारख्या परिसरातील कुटुंबांना होम स्टे चालवण्याचे प्रशिक्षण, त्यांच्यासाठी जीवनावश्यक वस्तू संकलन आणि वाटप यासारखे उपक्रम घेतो. त्यामुळे पर्यटन, सामाजिक जबाबदारी आणि पर्यावरणाबाबत भान महिलांमध्ये रुजवणे असे उद्देश यानिमित्ताने साध्य होत असल्याचे हेमांगी वर्तक स्पष्ट करतात.