जंगलात भटकंतीला गेल्यावर भेटणारे अनेक मित्र पुस्तकरूपाने प्रत्यक्ष आपल्या भेटीला येणार आहेत. त्याची सुरुवात चंपा वाघिणीपासून होणार असून, पुढे हत्ती, साल वृक्ष आणि इतर अनेक प्राणी त्यांची त्यांची गोष्ट सांगणार आहेत. वाघाच्या पुस्तकाचे प्रकाशन पुण्यात पुढच्या शनिवारी होणार आहे.
पुण्यातील ज्योत्स्ना प्रकाशनाने ‘माझे जंगलातील मित्र’ ही पुस्तकांची मालिका योजली आहे. ती मुख्यत: शाळेतील मुलांसाठी आहे. त्यासाठी प्रसिद्ध जंगलतज्ज्ञ विलास गोगटे यांनी लेखन केले आहे. त्यापैकी पहिले पुस्तक वाघावर आहे. त्यात वाघाची संपूर्ण कथा सांगितली आहे. चंपा नावाची वाघीण स्वत: तिची कथा सांगणार आहे. वाघांच्या हद्दी कशा असतात, त्याची आखणी कशी करतात, वाघ त्या कशा ठरवतात, त्यासाठी कशी भांडणे करतात अशी अतिशय रंजक आणि शास्त्रीय माहिती त्यात मांडण्यात आली आहे. त्याचबरोबर जगभरात वाघांची वसतिस्थाने कुठे आहेत, त्यांची शरीररचना कशी असते. त्याचा त्यांना कसा उपयोग होतो, वाघ आणि माणूस यांचे नाते, भारतीय संस्कृतीतील वाघाचे स्थान, व्याघ्र प्रकल्प व त्यांची सध्याची स्थिती अशी विविध गोष्टींचा त्यात समावेश आहे. या पुस्तकाचे प्रकाशन येत्या शनिवारी (५ जुलै) सायंकाळी ६ वाजता पुण्यातील इंद्रधनुष्य सभागृह, म्हात्रे पुलाजवळ होणार आहे.
प्राण्यांच्या मालिकेबाबत ज्योत्स्ना प्रकाशनचे संचालक मिलिंद परांजपे यांनी सांगितले, की वाघापाठोपाठ हत्ती आणि साल वृक्ष यांची पुस्तके पुढील काही महिन्यांमध्ये प्रकाशित केली जाणार आहेत. ही संपूर्ण मालिका गोगटे लिहीत आहेत. जंगलातील प्राणी, पक्षी, वृक्षांची शास्त्रोक्त माहिती आणि गोगटे यांच्या अभ्यासाचा प्रदीर्घ अनुभव यामुळे हा मालिका मुलांसाठी खूपच आकर्षक व उपयुक्त ठरू शकेल.
इंग्रजांच्या काळापासून…
भारतात वाघ हा महत्त्वाचा प्राणी आहे. तो जंगलाचा राजा समजला जात असल्याने पूर्वी त्याची मोठय़ा प्रमाणात शिकार केली जात नसे. मात्र, इंग्रज भारतात आल्यापासून हा दृष्टिकोन बदलला आणि त्याची बेसुमार शिकार सुरू झाली. त्यानंतर वाघ कसा संकटात आला.. अशा अनेक गोष्टी व किस्से या पुस्तकात आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा