पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये या वर्षी अकरावीसाठी ६६ हजार जागा उपलब्ध असून अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा १ जूनपासून सुरू होत आहे, अशी माहिती पुणे विभागाचे शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या वर्षांच्या तुलनेत या जागा सुमारे दोन हजारांनी जास्त आहेत.
गेल्या वर्षीपासून पुण्यातील अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवण्यात येत आहे. या वर्षी पुणे आणि िपपरी-चिंचवडमधील महाविद्यालयांमध्ये विज्ञान, कला, वाणिज्य या तिन्ही शाखांच्या मिळून ६६ हजार जागा उपलब्ध आहेत. गेल्यावर्षी मे महिन्यातच सुरू झालेली प्रवेश प्रक्रिया या वर्षी निकालाच्या तोंडावर सुरू होणार आहे. प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणजेच अर्जाचा पहिला भाग भरण्याची प्रक्रिया १ जूनपासून सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांनी आपली वैयक्तिक माहिती द्यायची आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आठ दिवस पहिला टप्पा सुरू राहणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात दहावीला मिळालेले गुण आणि महाविद्यालयांचे पर्याय द्यायचे आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमध्ये माहिती पुस्तिका उपलब्ध होणार आहेत. राज्यमंडळाव्यतिरिक्त इतर मंडळाकडून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिकांचे वाटप करण्यासाठी ९ केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. प्रवेश प्रक्रियेचे संकेतस्थळ २६ मेपासून सुरू होणार असून त्यानंतर विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेचे माहिती पुस्तक संकेतस्थळांवर पाहू शकतील.
या वर्षी विद्यार्थ्यांना पन्नास महाविद्यालयांचे पर्याय द्यावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे विभागनिहाय पर्याय देण्याची पद्धतही बंद करण्यात आली असून विद्यार्थ्यांनी आपले गुण आणि महाविद्यालयाचा कट ऑफ यांची सांगड घालत सरसकट पन्नास महाविद्यालयांचे पर्याय द्यायचे आहेत. विद्यार्थ्यांना किमान ४० महाविद्यालयांचे पर्याय द्यावे लागणार आहेत. मात्र, कला शाखेच्या इंग्रजी माध्यमाची महाविद्यालये कमी असल्यामुळे कला शाखेला इंग्रजी माध्यमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ५० महाविद्यालयांचे पर्याय द्यायचे आहेत. प्रवेश अर्ज भरण्याबाबत विद्यार्थी आणि पालकांसाठी मार्गदर्शन वर्गही घेण्यात येणार असून १ ते ५ जून या कालावधीत शाळास्तरावर मार्गदर्शन वर्ग घेण्यात येणार आहेत. त्यानंतर ८ आणि ९ जूनला विभागनिहाय केंद्रांवर मार्गदर्शन वर्ग घेण्यात येतील.
प्रवेश प्रकियेचे संकेतस्थळ – http://pune.fyjc.org.in  (२६ मेपासून)

इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना माहिती पुस्तिका येथे मिळतील.
स. प. महाविद्यालय, आबासाहेब गरवारे महाविद्यालय, शाहू मंदिर विद्यालय, वसंतराव सणस महाविद्यालय, नौरोसजी वाडिया महाविद्यालय, आकुताई कल्याणी साधना महाविद्यालय, फग्र्युसन महाविद्यालय, जयहिंद महाविद्यालय, म्हाळसाकांत महाविद्यालय

अल्पसंख्याक महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेवर नजर
अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन राबवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. त्याबाबत महाविद्यालयांना सूचना दिल्या असून त्यांच्याकडील प्रवेश प्रक्रिया पारदर्शकपणे व्हावी यासाठी महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यात येईल, असे जाधव यांनी सांगितले.

Story img Loader