पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये साधारण ६१ हजार विद्यार्थ्यांनी अकरावीचे अर्ज भरले असून मंगळवारी रात्री दहा वाजेपर्यंत अकरावीचे अर्ज अंतिम करण्यासाठी मुदत होती. या वर्षी राज्य मंडळाशिवाय इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे अर्ज वाढले असल्याचे अकरावी केंद्रीय प्रवेश समितीतील अधिकाऱ्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांअभावी या वर्षी ८ महाविद्यालये बंद झाली आहेत.
अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने केली जाते. या वर्षीपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सायंकाळपर्यंत ६१ हजार ८१० अर्ज आले असून त्यापैकी ६० हजार ३०३ विद्यार्थ्यांनी अर्ज अंतिम केले आहेत. या वर्षी राज्यमंडळाशिवाय इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या अर्जात वाढ झाल्याचे समितीतील सदस्यांनी सांगितले. आलेल्या अर्जापैकी राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांचे ५७ हजार ९७९ अर्ज आहेत, तर इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे ३ हजार ८३१ अर्ज आले आहेत.
या वर्षी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अकरावीच्या ६६ हजार ६६५ जागा उपलब्ध आहेत. या वर्षी गेल्यावर्षीच्या तुलनेत ४ हजार ३२० जागा वाढल्या आहेत. नव्याने स्वयंअर्थसहाय्यित महाविद्यालये सुरू झाल्यामुळे या जागा वाढल्या असल्याचे अकरावी केंद्रीय प्रवेश समितीच्या अध्यक्ष सुमन शिंदे यांनी सांगितले. विद्यार्थिसंख्येच्या अभावी ८ महाविद्यालये या वर्षी बंद करण्यात आली आहेत. या वर्षी विज्ञान शाखेच्या २८ हजार ११० जागा उपलब्ध आहेत. त्यापैकी ८० जागा या मराठी माध्यमाच्या आहेत. वाणिज्य शाखेच्या २८ हजार ७१५ जागांपैकी १२ हजार ६० जागा या मराठी माध्यमाच्या तर १६ हजार ६६५ जागा या इंग्रजी माध्यमाच्या आहेत. कला शाखेच्या एकूण १० हजार ८४० जागा उपलब्ध आहेत. त्यातील ७ हजार ७०० जागा मराठी माध्यमाच्या आणि ३ हजार १४० जागा इंग्रजी माध्यमाच्या आहेत.
बोर्डानुसार अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या
राज्यमंडळ – ५७ हजार ९७९
सीबीएसई – २ हजार २७७
आयसीएससी – १ हजार १९३
आयबी – ७
आयजीसीएसई – १२
एनआयओएस – १५०
इतर – १९२
द्विलक्षी अभ्यासक्रमासाठी ६ हजार जागा
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ७५ महाविद्यालयांमध्ये द्विलक्षी अभ्यासक्रम चालवण्यात येत असून त्यासाठी एकूण ६ हजार १०० अशी प्रवेश क्षमता आहे. सहा विषयांतील द्विलक्षी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमाचे प्रवेश महाविद्यालय स्तरावर करण्यात येणार आहेत.
अभ्यासक्रम आणि प्रवेश क्षमता
संगणकशास्त्र (३ हजार २७५) , इलेक्ट्रॉनिक्स (२ हजार ४००), इलेक्ट्रिकल मेन्टेनन्स (१००), मेकॅनिकल मेन्टेनन्स (१००), स्कूटर मोटरसायकल रिपेअरिंग (१७५), सिव्हील इंजिनिअरिंग (५०)

Story img Loader