अकरावीचे अर्ज भरताना अडचणी निर्माण झाल्याची तक्रार काही शाळांमधून करण्यात येत आहे. मात्र, अर्ज भरण्यातील तांत्रिक मुद्दा न कळल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ होत असल्याचे अकरावी केंद्रीय प्रवेश समितीकडून सांगण्यात येत आहे.
अकरावीचे ऑनलाइन अर्ज भरताना अडचणी निर्माण होत असल्याची तक्रार काही शाळांकडून करण्यात आली होती. महाविद्यालयांचे पर्याय भरूनही अर्ज अंतिम होत नसल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. मात्र, संकेतस्थळामध्ये कोणत्याही अडचणी नसल्याचे अकरावी केंद्रीय प्रवेश समितीने सांगितले आहे. अशा प्रकारच्या अडचणी टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज अधिक काळजीपूर्वक भरावा. पहिल्या तीस पर्यायांमध्ये दिलेली महाविद्यालये आपल्या विभागातील महाविद्यालयांच्या यादीमध्ये पुन्हा देता येणार नाहीत. त्याचबरोबर महाविद्यालय फक्त मुलांचे अथवा मुलींचे नाही ना याचीही खातरजमा अर्ज भरताना करावी. अर्ज अंतिम होत नसेल, तर एखाद्या महाविद्यालयाचा कोड टाकायचा राहिला आहे का, कोड चुकला आहे का, याची पडताळणी करावी, अर्ज भरता येत नसेल, तर सर्च बटणावर क्लिक करावे, जेणेकरून अर्ज भरण्यामध्ये काय त्रुटी राहिल्या आहेत त्याची माहिती विद्यार्थ्यांना मिळू शकेल, अशा सूचना केंद्रीय प्रवेश समितीकडून देण्यात आल्या आहेत.
अर्जाचा दुसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी सोमवारी (२३ जून) सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदत आहे. आतापर्यंत ३१ हजार १७३ विद्यार्थ्यांचे अर्ज निश्चित झाले आहेत.

Story img Loader