पुणे: महापालिकेमध्ये १०० कनिष्ठ अभियंत्यांची भरती करण्यात येणार असून, येत्या सोमवारपर्यंत त्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी दिली. कनिष्ठ अभियंता भरतीसाठीची तीन वर्षांच्या अनुभवाची अट सेवा प्रवेश नियमावलीतून काढण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी महापालिकेने कनिष्ठ अभियंत्यांच्या १३५ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली होती. या प्रक्रियेतील प्रतीक्षा यादीदेखील जाहीर करण्यात आली होती. या यादीची मुदत ३१ डिसेंबर २०२३ रोजी संपुष्टात आली आहे. त्यामुळे या प्रक्रियेतील न्यायप्रविष्ट प्रकरणातील जागा वगळता अन्य जागांसाठी नव्याने भरती केली जाईल.
हेही वाचा… रब्बी हंगामातील पेरण्या अकरा टक्क्यांनी घटल्या ; जाणून घ्या पेरण्यांमध्ये घट होण्याची कारणे
महापालिकेने २०१४ मध्ये सेवा प्रवेश नियमावली मंजूर केली आहे. नियमावली मंजूर करताना कनिष्ठ अभियंता पदासाठी तीन वर्षांच्या अनुभवाची अट टाकण्यात आली होती. त्यामुळे अनुभवाची बनावट कागदपत्रे उमेदवारांकडून सादर करण्यात आल्याची बाब गेल्या वर्षी कनिष्ठ अभियंता पद भरतीवेळी निदर्शनास आली होती. लेखी परीक्षेनंतर बनावट कागदपत्रे सादर करून नोकरी मिळविल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तिघा अभियंत्यांना नोकरीतून मुक्त करण्यात आले होते. त्यामुळे अनुभवाची अट काढून टाकण्यात यावी, अशी मागणी होत होती. त्यानुसार येत्या सोमवारपर्यंत कनिष्ठ अभियंता भरतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे.