पुण्याला पाणी पुरवणाऱ्या चारही धरणांमध्ये मिळून एकूण १५ अब्ज घनफूटच्या (टीएमसी) आसपास पाणीसाठा शिल्लक असून, हा साठा सरासरीच्या सुमारे ५२ टक्के इतका आहे. आतापर्यंत धरणे भरून वाहणे अपेक्षित असले तरी प्रत्यक्षात इतका कमी साठा असल्याने धरणे भरणार का, याबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पुण्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाने मोठय़ा काळासाठी उघडीप दिली आहे. त्याचा परिणाम धरणांच्या साठय़ावर झाला आहे. पुण्यातील धरणे १५ ऑगस्टपर्यंत भरतात आणि त्यातील पाणी सोडण्यास सुरुवात होते. या वेळी मात्र विपरीत स्थिती आहे. पावसाअभावी धरणांमधील साठय़ात वाढ झालेली नाही. विशेषत: गेल्या दीड महिन्यामध्ये (१ जुलैपासून) जोरदार पाऊस अपेक्षित असतो. प्रत्यक्षात तसे न होता पावसाचे प्रमाण कमालीचे घटले आहे. पुण्यासाठीच्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणांच्या क्षेत्रातही फारसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे अजूनही पाणीसाठा केवळ १५.१६ टीएमसी म्हणजेच ५२ टक्क्य़ांच्या आसपास आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी पावसाची स्थिती फारशी चांगली नव्हती. तरीसुद्धा पुण्याच्या धरणांमध्ये १७ ऑगस्ट रोजी ९० टक्क्य़ांहून जास्त साठा होता. या वर्षी त्याहून वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.
पुण्याप्रमाणेच पिंपरीला पाणी पुरवणाऱ्या पवना धरणातही गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच कमी पाणीसाठा आहे. या धरणात आतापर्यंत ६.२० टीएमसी इतका उपयुक्त साठा आहे. त्याची टक्केवारी ७२.८० इतकी आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा