राज्य सरकारने इंधनावरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) कमी करून तो एक ते चार टक्क्यांपर्यंत मर्यादित ठेवण्याची गरज आहे. राज्यामध्ये सत्ताबदल झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत. शासनाच्या सहकार्यातून हा बदल घडू शकेल. हा बदल झाला तर विमानसेवेचा विस्तार होऊ शकेल, असे मत नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या वतीने आयाेजित कार्यक्रमात शिंदे बोलत होते.येत्या दोन वर्षांत देशभरातील विमानतळांची संख्या २२० पर्यंत पोहोचेल, असे सांगून शिंदे म्हणाले, हे मंत्रालय विमानतळ आणि विमाने एवढ्यापुरतेच मर्यादित नाही. शेतकऱ्यांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांच्या पायाभूत सुविधांचा विचार करावा लागतो. कार्गो विमान वाहतूक निर्यात यापूर्वी केवळ चार टक्के होती. गेल्या दीड वर्षात ही निर्यात १९ टक्क्यांपर्यंत गेली आहे.देशभरामध्ये विमानसेवेचा विस्तार होत आहे. हा विस्तार होत असताना मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. हे ध्यानात घेऊन उच्च दर्जाच्या वैमानिक घडविणाऱ्या प्रशिक्षण केंद्राची गरज भासेल, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले.