‘‘स्त्रीच्या बरोबर पुरुषही समजदार होण्याची गरज आहे. काळानुरूप पुरुषाची समज वाढली नाही, त्यामुळे आज अनेक सामाजिक समस्या निर्माण होत आहेत,’’ असे मत सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे यांनी रविवारी व्यक्त केले. ‘मिळून साऱ्याजणीं’ बरोबर आता मिळून सारेजण झाले तर अनेक प्रश्न सुटू शकतील, असेही ते म्हणाले.
कृ. ब. तळवलकर ट्रस्टतर्फे गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते ‘मिळून साऱ्याजणी’ च्या संपादक विद्या बाळ यांना समाजशिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. आळंदी येथील जागृती अंधशाळेच्या सकिना बेदी यांना ‘सेवाव्रती’, मधुकर गोखले यांना ‘अनुकरणीय उद्योजक’ आणि ‘लोकसत्ता’ चे वरिष्ठ सहसंपादक अभिजित घोरपडे यांना ‘अवनीमित्र’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रत्येकी २५ हजार रुपये रोख आणि मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
गिरीश प्रभुणे म्हणाले, ‘‘वेगवेगळ्या तुकडय़ांमध्ये समाज विभागाला गेला आहे. या तुकडय़ांना जोडण्याचे काम विविध क्षेत्रात काम करणाऱ्या या पुरस्कारार्थीनी केले आहे. गेल्या काही दिवसांत घडणाऱ्या घटनांमुळे निर्माण झालेले नैराश्य या लोकांचे काम पाहिल्यावर दूर होते आणि भारताचे भविष्य उज्ज्वल आहे याची खात्री वाटू लागते.’’
विद्या बाळ म्हणाल्या, ‘‘स्त्री-पुरुष समता, जातीअंताचे काम या संदर्भात पूर्वसुरींनी कार्य केले आहे. हेच काम मी कार्यकर्ता आणि पत्रकार अशा दोन भूमिकांतून करण्याचा प्रयत्न केला. शिक्षणाबरोबर संस्कार देणाऱ्या तळवलकरांसारख्या शिक्षकांची आज समाजाला गरज आहे. अशा शिक्षकांच्या योगदानातूनच समतोल समाज घडू शकतो.’’
बेदी म्हणाल्या, ‘‘अशा पुरस्कारांमधून काम करण्यासाठी आणखी बळ मिळते. आपण जे काम करतो आहोत, ते योग्य आहे आणि त्याला इतरांचीही साथ आहे हा विश्वास अशा कौतुकातून मिळतो.’’ गोखले म्हणाले, ‘‘कुतूहल, ते शमवण्यासाठी प्रयत्न, जिद्द, वेगळेपण आणि स्वत:वर विश्वास यातूनच नव निर्मिती होत असते, नवे शोध लागतात.’’
घोरपडे म्हणाले, ‘‘स्पेशलायझेशनच्या जमान्यात सर्वागीण दृष्टिकोन विकसित होताना दिसत नाही. त्यामुळे प्रत्येक समस्येचा र्सवकष विचार होत नाही.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा