पिंपरी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदावरून भाऊसाहेब भोईर यांना हटवण्यासाठी एकीकडे मोहीम सुरू झाली असताना त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका समर्थक नगरसेवकांनी घेतली आहे. ‘भोईर हटाव’ मोहिमेसाठी पुढाकार घेणाऱ्या कैलास कदम यांची गुन्हेगारी पाश्र्वभूमी असल्याचे सांगत, बाबा तापकीर गावापुरते पुढारी असल्याची संभावना विरोधी पक्षनेते विनोद नढे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली.
काँग्रेसमधील नाराज पदाधिकाऱ्यांनी ‘भोईर हटाव-काँग्रेस बचाव’ मोहीम सुरू केल्याने पक्षातील वातावरण पेटले आहे. विरोधकांकडून हल्लाबोल झाल्यानंतर प्रत्युत्तर देण्यासाठी भोईरांनी नढे यांना पुढे करून विरोधकांवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी कार्यकर्त्यांचे बळ वाढवत असताना पक्षातील स्वंयघोषित नेते मनोधैर्य खच्ची करत आहेत. राजकारणात तसेच समाजकारणात २५ वर्षांपासून सक्रिय असलेले भोईर आदर्श व्यक्तिमत्त्व आहे, असे सांगत नढे यांनी घरातील वाद घरातच ठेवून संघटना बळकट करण्याचे आवाहन केले. नगरसेवक गणेश लोंढे, राहुल भोसले, जालींदर शिंदे, विमल काळे आदी उपस्थित होते.
नढे म्हणाले,की गुन्हेगारी पाश्र्वभूमी असूनही प्रतिमा सुधारण्यासाठी कदमांना विरोधी पक्षनेतेपद भोईरांनी मिळवून दिले. राजीनामा न दिल्याने त्यांची हकालपट्टी करावी लागली. पद गेल्यानंतर भोईरांचे दोष व पक्षाची दुरवस्था त्यांना दिसू लागली. विरोधी पक्षनेता असताना कदमांनी कोणालाही विश्वासात घेतले नाही. त्यांचे कार्यालय म्हणजे ‘अड्डा’ बनले होते. ‘इंटक’ च्या माध्यमातून त्यांच्या विविध उद्योगांविषयी तक्रारी वाढत आहेत. स्वत:ची उंची पाहून कदमांनी टीका करावी. बाबा तापकीरांना स्वत:च्या मुलाला निवडून आणता येत नाही. त्यांनी शहराऐवजीचा काळेवाडीतील वॉर्डापुरता विचार करावा. भोईर पक्षाचे कार्यक्रम घेतात, तेव्हा हे स्वंयघोषित नेते गायब असतात. मुख्यमंत्री व संपर्कमंत्र्यांविषयी भोईरांनी कोणतीच तक्रार केली नसताना त्याचे भांडवल केले जात आहे. याचा पुरावा असलेली सीडी श्रेष्ठींना देणार आहे, असे नढे यांनी म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा