दाट आणि मलईदार लस्सी खायची असेल किंवा कढईतलं दूध प्यायचं असेल, तर हमखास आठवण येते ती रास्ता पेठेतील कैलास डेअरीची. इथे प्रवेश करतानाच लोखंडी कढईत आटत असलेलं दूध आपल्याला दिसतं. गल्ल्यापाशी घट्ट दह्य़ाच्या परातीच्या पराती पाहायला मिळतात. कोणी लस्सीची ऑर्डर देत असतं तर कोणी किलोभर दही घरी नेण्यासाठी डबा घेऊन आलेलं असतं..

पुण्याच्या पूर्व भागात राहणाऱ्या कोणालाही कैलास डेअरी हे अगदी परिचित नाव. कैलास डेअरीची स्थापना १९५० च्या दरम्यान झाली. रास्ता पेठेतील रास्ते वाडा चौकात सुरू झालेली ही डेअरी चालवण्याचा वारसा या घराण्यातील पुढच्या पिढय़ांनीही चांगला जपला आहे. रामलाल सुखरामदास अगनानी आणि जवाहरलाल अगनानी या दोघा बंधूंनी ही डेअरी सुरू केली. अजमेर येथून ते पुण्यात आले होते आणि ते या व्यवसायात उतरले. रामलाल अगनानी यांचे कन्हय्याशेठ आणि अशोकशेठ हे पुत्र याच व्यवसायात आहेत आणि त्यांच्या पाठोपाठ कैलास, गिरीश आणि श्याम अगनानी ही पुढची पिढीही आता कैलास डेअरीचा व्यवसाय सांभाळत आहे. पुण्याच्या पूर्व भागात ही डेअरी माहिती नाही असं फारच क्वचित कोणाचं होत असेल. गेली तब्बल सहासष्ट-सदुसष्ट वर्ष खवय्यांना संतुष्ट करत असलेल्या या व्यवसायाचं मुख्य सूत्र सचोटी हेच राहिलं आहे. ही सचोटी पदार्थ तयार करण्यातली असो किंवा व्यवहारातील असो, सचोटीचा हा जो संस्कार वडीलधाऱ्यांनी दिला, तोच आम्ही पाळत आलो, असं कन्हय्या अगनानी आवर्जून सांगतात.

Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
redevelopment plan of dharavi
धारावीविषयी नवा दृष्टिकोन हवा!
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव
Mumbai Metropolitan Region Development Authority Still waiting for Mogharpada car shed site Mumbai print news
मोघरपाडा कारशेडच्या जागेची प्रतीक्षा कायम; हस्तांतरणाबाबत शासन निर्णय प्रसिद्ध होऊन वर्ष उलटले तरी जागेचा ताबा नाही
bjp leader ashish shelar article allegations on shiv sena ubt for plot grab in dharavi
पहिली बाजू : भूखंड खादाडांचा डाव उद्ध्वस्त
tension in malad aksa village over rehabilitation of ineligible residents of dharavi
जमीन मोजणीला विरोध; अपात्र धारावीकरांच्या पुनर्वसनावरून मालाड अक्सा गावात तणाव
loksatta readers feedback
लोकमानस: सिग्मॉइड कर्व्हच्या उतारावर महाराष्ट्र

मलईदार, घट्ट लस्सी, कढईतलं आटीव दूध, घट्ट कवडीदार, मलईचं दही आणि ताक हे कैलास डेअरीतले लोकप्रिय पदार्थ. त्यामुळेच इथे जी लस्सी मिळते तिचं नाव देखील मलई लस्सी असंच आहे. इथली लस्सी घट्ट तर असतेच पण ती खाताना किंवा पिताना तिचं नाव मलई लस्सी का आहे हे आपल्याला कळतं. त्यासाठीच इथे लस्सीच्या ग्लासबरोबर चमचाही दिला जातो. त्या चमच्यानं इथे लस्सी खाताना न कळत ‘वाऽऽ’ अशीच दाद येते. जुन्या वळणाचं असं हे दुकान. काळानुरूप काही बदल त्यात झाले असले, तरी डेअरीचं मूळ रूप पूर्वीसारखंच आहे. पूर्वी समोरासमोर मांडलेले दोन लांबलचक लाकडी बाक आणि त्यांच्यासमोर टेबल्स अशी इथली साधारण बैठक व्यवस्था होती. आताही लाकडी बाक नसले तरी एकूण रचना तशीच आहे. कैलास डेअरीची मलई लस्सी जितकी प्रसिद्ध आहे, तेवढेच लस्सीचे इतर प्रकारही प्रसिद्ध आहेत. खारी लस्सी, मँगो लस्सी, रोझ लस्सी, पिस्ता लस्सी, स्ट्रॉबेरी लस्सी, तिरंगा लस्सी, गुलकंद लस्सी, ड्रायफ्रूट लस्सी असे आणि इतरही आणखी लस्सीचे प्रकार इथे मिळतात. अर्थात या सगळ्या लस्सी तयार करण्यासाठी जी मूळ मलई लस्सी तयार असते तीच एवढी दर्जेदार असते की त्यामुळे या सगळ्या लस्सी उत्तमच बनतात.

लस्सी इतकाच इथला दुसरा लोकप्रिय प्रकार म्हणजे कढई दूध किंवा मसाला दूध. इथे येणाऱ्यांना ही दोन्ही नावं तशी मान्य नाहीत. येणारा अगदी सरावानं आत येतो, बाकावर बसतो आणि दोन दूध, एक हाफ दूध अशी ऑर्डर देतो. नेहमी येणाऱ्याला कशाप्रकारचं दूध हवं ते कन्हय्याशेठ किंवा अशोकशेठना नेमकं माहिती असतं. त्यामुळे कोणाला किती साखर घालून दूध द्यायचं हे त्यांचं मोजमापही पक्क असतं. लोखंडी कढईत हे दूध आटत असतं आणि ग्राहकाला देण्यापूर्वी दोन पितळी हंडय़ांमध्ये त्यांची धार आलटून पालटून ओतली जाते. ग्लास भरून झाल्यावर त्याच कढईतील दुधावरची थोडी मलई काढून ग्लासमध्ये वरच्या बाजूला टाकली जाते. हा सगळा प्रकार पाहण्यासारखा असतो.

दूध, लस्सी बरोबरच इथलं ताक किंवा मसाला ताक आणि घट्ट दही हेही प्रकार भरपूर खपाचे. अ‍ॅल्युमिनियमच्या परातींमध्ये लावलं जाणारं घट्ट कवडीदार, मलईचं दही घरी घेऊन जाणाऱ्यांची गर्दी इथे दिवसभर असते. शिवाय इथली आणखी एक खासियत म्हणजे जे दही न्यायला येतात, त्यातले काही जण दह्य़ात साखर घालून ते दही डब्यातून घरी नेतात किंवा काही जण काळंमीठ आणि खास मसाला टाकून दही घेऊन जातात. हा जरा इथला वेगळा प्रकार. कैलास डेअरीचं वैशिष्टय़ं हे आहे की इथल्या पदार्थाची चव वर्षांनुवर्ष बदललेली नाही. हे सगळे पदार्थ कसे तयार करायचे यांचं शिक्षण कन्हय्या आणि अशोक यांना वडिलांकडून मिळालं. ते जे तंत्र त्यांनी शिकवलं त्यात या पुढच्या पिढय़ांनी जरा देखील बदल केलेला नाही.

पदार्थ तयार करण्याची नवी तंत्रं आली, नव्या पद्धती आल्या तरी पूर्वापार जी पद्धती होती तीच आम्ही आजही तशीच ठेवली आहे, असं ही मंडळी अभिमानानं सांगतात. जो व्यवसाय करायचा तो सचोटीनं करायचा. जे पदार्थ ग्राहकांना द्यायचे ते चांगलेच द्यायचे. त्यात जराही उणीव राहता कामा नये, हा या मंडळींचा शिरस्ता. त्यामुळेच कैलास डेअरीतल्या पदार्थाच्या दर्जाबाबत कोणाचं कधी दुमत होऊच शकत नाही. इथे येणाऱ्यांचे आणि अगनानी कुटुंबीयांचे ग्राहक मालक असे संबंध नाहीत. नेहमी येणारी सगळी मंडळी शेठजींशी चार शब्द बोलल्याशिवाय जात नाहीत. हे नातं आपल्याला खूप काही सांगून जातं. अगनानी कुटुंबीयांची सर्वाशी गप्पा मारण्याची शैली, झटपट तोंडी हिशेब करण्याचं त्यांचं कसब, इथे मिळणारी मस्त दाट लस्सी, कढईतलं दूध, ग्राहकांशी असलेलं या मंडळींचं नातं.. या सगळ्या गोष्टीचं हे मस्त मिश्रण खास अनुभवायलाच हवं.

  • कुठे ? : रास्ता पेठ, रास्ते वाडा चौकात
  • कधी : सकाळी दहा ते रात्री अकरा