मिसळींचं वैविध्य हवं असेल त्यांच्यासाठी हे एक उत्तम ठिकाण झालं आहे. चार चवींची मिसळ; शिवाय कोल्हापुरी कटवडा आणि इतही चवीष्ट पदार्थाचा आस्वाद इथे घेता येतो.
मिसळीसाठी पुण्यातील अनेक छोटी-मोठी हॉटेल्स, टपऱ्या आणि हातगाडय़ाही प्रसिद्ध आहेत. या प्रत्येक ठिकाणच्या मिसळीचं काही ना काही वैशिष्टय़ं आहेच. एका मिसळीसारखी दुसरी मिसळ नसते. त्यामुळे मिसळप्रेमींना ही अशी अनेक ठिकाणं ही एक पर्वणीच असते. पुणेकरांच्या या मिसळप्रेमामुळेच मिसळीचं एक नवं ठिकाण पुणेकरांना अलीकडेच खुलं झालंय. शुक्रवार पेठेत बाजीराव रस्त्याजवळ सुरू झालेलं हे ठिकाण म्हणजे कलंदर मिसळ. या ठिकाणाची मुख्य खासियत म्हणजे इथे आपल्याला चार चवींची मिसळ मिळू शकते. मिसळीच्या एकाच प्रकारात चवींचं असं वैविध्य असल्यामुळे कोणत्याही मिसळप्रेमीसाठी इथली भेट अपरिहार्यच ठरावी.
कोल्हापुरी मिसळ म्हणजे तांबडा, झणझणीत रस्सा वापरून दिली जाणारी मिसळ तशी आपल्या परिचयाची आहे. पण इथे जशी तांबडा रस्सा मिसळ मिळते तशीच पांढरा रस्सा मिसळ, हिरवा रस्सा मिसळ आणि काळा रस्सा मिसळ असेही आणखी तीन प्रकार आहेत. ज्यांना तिखट मिसळ आवडते त्यांच्यासाठी इथे तांबडा रस्सा मिसळ आहे. ती चांगली झणझणीत असते. ज्यांना मिसळ खायची असते, मिसळ आवडते पण तिखट आवडत नाही त्यांच्यासाठी पांढरा रस्सा हा एक चांगला पर्याय आहे. या रश्श्यासाठी वापरली जाणारी ग्रेव्ही मुख्यत: सुकामेव्यामध्ये बनवलेली असल्यामुळे त्याची चव काही वेगळीच आहे. हिरवा रस्सा हा कोथिंबीर, कढीपत्ता आणि इतर काही पदार्थ वापरून तयार केलेला असतो. त्या बरोबरच अनेक प्रकारचे मसाले आणि इतर पदार्थ वापरून काळ्या मिसळीचा रस्सा तयार केला जातो. हे चारही रस्से चवदार आणि वेगवेगळ्या चवींच्या मिसळीचा आनंद नक्कीच देतात. मिसळीच्या बाहेरच्या ऑर्डर देखील घेतल्या जातात. मिसळीबरोबरच खास कोल्हापुरी थाटाचा इथला कटवडाही खाऊन बघावा. मुळात वडा तयार करण्याची जी पद्धत आहे तीच वेगळी आहे. हा वडा आकाराने चांगला मोठा आणि त्याचे आवरणही जाड. झणझणीत कटबरोबर खाताना अस्सल कोल्हापुरी कटवडय़ाची चव नक्कीच चाखता येते. केवळ मिसळच नाही तर पोहे, उपीट, भजी, वडापाव हे इतरही पदार्थ इथे मिळतात आणि तेही चवीष्ट असेच असतात.
..तर आधी उल्लेख केल्याप्रमाणे मिसळप्रेमाबद्दल थोडं सांगायला हवं. ईश्वरी कुलकर्णी या मूळच्या कोल्हापूरच्या. साळोखे कुटुंबातील. विवाहानंतर त्या पुण्यात आल्या. त्यांच्या आईंची म्हणजे लक्ष्मीबाई साळोखे यांची कुटुंबात पाककला निपुण म्हणून ओळख आहे. अनेक उत्तमोत्तम पदार्थ बनवण्यात त्यांचा हातखंडा आहे. हाच वारसा बहिण उज्ज्वला आणि ईश्वरी यांच्याकडेही आला आहे. त्यांना उत्तम चवीचे पदार्थ तयार करण्याची आवड आहे आणि त्याही पाककलेत निपुण आहेत. मार्केटिंगच्या क्षेत्रात पुण्यात नोकरी करत असताना आपण कधी स्वत:चा व्यवसाय सुरू केला, तर तो खाद्यक्षेत्रातलाच करायचा हा विचार त्यांच्या मनात पक्का होता. पुण्यात अधूनमधून भरणारे मिसळ महोत्सव त्यांनी बघितले आणि त्यातूनच त्यांनी खास मिसळीचं हॉटेल सुरू करायचं ठरवलं. मिसळ द्यायची तर काही तरी वेगळेपण जपणारी शिवाय अस्सल कोल्हापुरी चवीची मिसळ खवय्यांना द्यायची हेही त्यांनी आधीच ठरवलं होतं. त्यामुळे या हॉटेलमध्ये तुम्हाला चार चवींच्या मिसळीचा आस्वाद घ्यायला मिळतो. आणखी एक वेगळेपण सांगायला हवं. ते म्हणजे इथे बहुतांश महिला काम करतात. खरेदीपासून ते सर्व पदार्थ तयार करण्यापर्यंतची कामं स्वत: कुलकर्णी करतात. आपण फक्त महिलांच्या मदतीने देखील चांगल्या पद्धतीनं हॉटेल चालवू शकतो, महिलांमध्ये तेवढे कर्तृत्व असते हा विश्वास कुलकर्णी यांना होता आणि त्यानुसार चार-पाच जणींच्या मदतीनं त्या हे हॉटेल उत्तम रीत्या चालवत आहेत.
कलंदर मिसळ
- कुठे? – १९३/९५ शुक्रवार पेठ, बाजीराव रस्त्यालगत
- कधी? – सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत सोमवारी बंद
- संपर्क : ९०९६९१४७५८