खासदार सुरेश कलमाडी यांनी बोलावलेल्या बैठकीत कलमाडी आणि नगरसेवक दीपक मानकर यांच्यात शनिवारी जोरदार हमरीतुमरी झाली. त्यानंतर गोंधळ एवढा वाढला की बैठकच उधळली गेली. उपस्थित महिलांमध्ये पळापळ होऊन या प्रकारात अनेक महिला पडल्या. या दोघांमधील बाचाबाचीचा प्रकार पाहून उपस्थित सर्वच कार्यकर्ते व पदाधिकारीही अवाक झाले होते.
झोपडपट्टीवासीयांच्या प्रश्नावर कलमाडी पुण्यात मोर्चाचे आयोजन करणार असून त्याच्या तयारीसाठी काँग्रेसमधील प्रमुख कार्यकर्ते व नगरसेवकांची बैठक त्यांनी शनिवारी दुपारी मॅरेथॉन भवन येथे बोलावली होती. आमदार रमेश बागवे यांनी बैठकीला मोठी संख्या आणली होती. झोपडपट्टीवासीयांची देखील मोठी उपस्थिती या वेळी होती. बैठकीत मोर्चासंबंधीचे निवेदन करणारे बागवे यांचे सविस्तर भाषण प्रारंभी झाले. त्यानंतर शासनाकडे काय मागण्या कराव्यात तसेच निवेदन काय द्यावे आदीबाबत सूचना करा, असे कलमाडी यांनी उपस्थितांना सांगितले.
या सूचनेनंतर काही कार्यकर्त्यांनी सूचना केल्या. त्यानंतर नगरसेवक व माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी कलमाडींच्या विरोधात भाषण सुरू केले. गेल्या वेळीही तुम्ही असाच मोर्चा काढला होता. मात्र, मोर्चा काढून कोणतेही प्रश्न सुटले नाहीत. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी तुमची निवडणूक जवळ आल्यामुळे मोर्चा काढत आहात, असे मानकर म्हणाले. त्यांच्या या विधानांना बागवे यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यावर पुन्हा मानकर बोलू लागले. असा प्रकार दोन-तीनदा झाला. त्यावर कलमाडी ‘अरे, मगाशी बोललास ना, आता खाली बस,’ असे मानकर यांना म्हणाले. त्यामुळे पुन्हा मानकर उठून म्हणू म्हणाले, की आम्हाला बोलू देणार नसाल, तर बोलावले कशाला. आम्ही जातो. त्यावर कलमाडी यांनी ‘तू मधेमधे बोलू नकोस. तू जा, जा, तू जा आता,’ असे प्रत्युत्तर मानकर यांना दिले. त्यातून दोघांमध्ये चांगलीच हमरीतुमरी झाली.
त्या प्रकारामुळे बैठकीत गोंधळ सुरू झाला आणि हमरीतुमरीनंतर वातावरण चांगलेच तापले. त्यामुळे महिलांमध्ये पळापळ सुरू झाली आणि पळापळीनंतर बैठकही उधळली गेली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा