“स्व, समाज आणि सृष्टी यांच्याकडे पाहण्याची समग्र दृष्टी माणसाला यायला हवी. ती दृष्टी आपलं शिक्षण आणि समाज देत नाही. परंतू ती विकसीत करता येऊ शकते,” असं मत सामाजिक कार्यकर्ते आणि समाजशास्त्र अभ्यासक कल्याण टांकसाळे यांनी व्यक्त केलं. तसेच एक कप चहा पिण्याच्या कृतीकडेही व्यवस्था म्हणून पाहिल्यास आपल्या आजूबाजूच्या अनेक गोष्टी अधिक व्यवस्थितपणे समजून घेता येतील, असंही नमूद केलं. ते शुक्रवारी (२३ डिसेंबर) मराठी विज्ञान परिषद, पुणे विभागाने आयोजित केलेल्या ‘एक कप चहाची व्यवस्था आणि आपले जगणे’ या विषयावरील व्याख्यानात बोलत होते. हा कार्यक्रम पुण्यातील एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन येथे पार पडला.
कल्याण टांकसाळे म्हणाले, “सिस्टीम हा शब्द आपण अनेकदा वापरतो. तेव्हा एखादी व्यवस्था कशी आहे, ती कशी असावी याविषयी आपण बोलत असतो. मुळात एखादी व्यवस्था किंवा प्रणाली आकाराला कशी येते? ती कशी टिकून राहते? का कोलमडते? आपण ती हवी तशी बदलू शकतो का? या प्रश्नावर फारसा विचार होत नाही. तशी दृष्टी आपलं शिक्षण आणि आपला समाज देत नाहीत. मग चांगल्या हेतूने केलेले प्रयत्नही फसतात. आजची उत्तरं, उद्याचे प्रश्न बनतात. करायला जातो एक आणि होतं भलतंच. असे अनुभव यायला नको असतील, तर आपला दृष्टीकोन, आपली विचार करण्याची पद्धत थोडी बदलावी लागेल.”
“‘एक कप चहा पिणं’ याघटनेकडे व्यवस्था म्हणून पहावं”
“‘एक कप चहा पिणं’ या साध्या घटनेकडे आपण एक व्यवस्था म्हणून पहायला शिकलो, तर वाढतं तापमान, रहदारी, गरीबी, तोट्यात चाललेली शेती, मधुमेह अशा गोष्टीही आपल्याला त्या व्यवस्थेशी संबंधित असल्याचे समजू शकेल. तसेच त्या सुधारण्यास हातभार लावता येऊ शकेल,” असं मत कल्याण टांकसाळे यांनी व्यक्त केलं.
“परिस्थितीकडे व्यवस्था म्हणून पाहण्याची दृष्टी देणारा ‘प्रणाली दृष्टिकोन’ समजून घेणं आवश्यक”
यावेळी त्यांनी मानवी इतिहासातील जगभरातील विविध उदाहरणे देत व्यक्ती, घटना, प्रसंग, परिस्थिती यांच्याकडे व्यवस्था म्हणून पाहण्याची दृष्टी देणारा ‘प्रणाली दृष्टिकोन’ समजून घेणं आवश्यक असल्याचं नमूद केलं.
“न्यूटनला थोडा वेगळा प्रश्न पडला असता तर…”
प्रणाली दृष्टिकोनावर बोलताना कल्याण टांकसाळे म्हणाले, “न्यूटनला झाडावरील सफरचंद वरून खालीच का पडले असा प्रश्न पडण्याऐवजी मुळात हे सफरचंद आलं कोठून, हे झाड खालून वर गेलं कसं? त्याला फळ लागलं कसं? याचा न्यूटनने विचार केला पाहिजे होता. तसं झालं असतं तर न्यूटनने जमिनीचा, जमिनीतील सुक्ष्मजीवांचा, रोपाचा, एक रोप वाढतं कसं, त्याला फुलं कशी येतात, फळ कशी येतात, त्याच्यावर तापमान, हवेचा, वातावरणातील जीवजंतुंचा काय परिणाम होतो याचा न्यूटनने विचार केला असता.”
“न्यूटनने गतीचे तीन नियम देण्याऐवजी सृष्टीच्या गुंतागुंतीकडे बघण्याचा दृष्टीकोन द्यायला हवा होता”
“न्यूटनने या सर्व गोष्टींचा विचार केला असता तर त्याला ही सृष्टी खूप गुंतागुंतीची आहे हे कळलं असतं. ही गुंतागुंतीची सृष्टी समजून घेण्यासाठी एक वेगळी दृष्टी लागेल. कदाचित त्या दिवशी न्यूटनने गतीचे तीन नियम देण्याऐवजी सृष्टीच्या गुंतागुंतीकडे बघायला दृष्टीकोन द्यायला हवा होता. आपल्या दुर्दैवाने न्यूटनला त्या दिवशी चुकीचा प्रश्न पडला. त्यामुळे आज जे प्रश्न आहेत ते आहेत,” असं मत टांकसाळे यांनी व्यक्त केलं.
हेही वाचा : विश्लेषण : प्लास्टिक निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय कशासाठी? यातून नेमके कोणते बदल होणार?
“न्यूटनच्या नियमांचा जमाखर्च मांडायला हवा”
“न्यूटनच्या त्या प्रश्नाने काय सृष्टी निर्माण झाली, त्याचे आपल्याला किती फायदे झाले आणि त्याची आपण, आपल्या येणाऱ्या पीढ्यांनी काय किंमत मोजली याचा जमाखर्च मांडायला वेळ लागेल. पण कधीतरी मांडुयात,” असंही नमूद केलं.