लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : ससूनमध्ये अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात बदल करण्यात आले. १९ मे रोजी अल्पवयीन मुलाला ससूनमध्ये आणण्यात आले होते. त्या दिवशीचे सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले असून, चित्रीकरणातून तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती मिळणार आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी सामील असल्याचे तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयात सांगितले.

कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाला वाचविण्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना बदलून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक वडील विशाल आणि आई शिवानी अगरवाल यांना अटक करण्यात आली. अगरवाल दाम्पत्याने कोणाच्या मध्यस्थीने ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे यांच्याशी संपर्क साधला, अल्पवयीन मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉ. श्रीहरी हाळनोरला कोणी सांगितले, या दृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत असल्याची माहिती सहायक आयुक्त तांबे यांनी न्यायालयात दिली.

आणखी वाचा-बारावीनंतरच्या डीएल.एड. अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया जाहीर, पहिली गुणवत्ता यादी कधी?

रक्ताचे नमुने बदल प्रकरणात डॉ. अजय तावरे, डॉ. श्रीहरी हाळनोर, शिपाई अतुल घटकांबळे यांना अगोदरच अटक करण्यात आली आहे. अगरवाल दाम्पत्याच्या रक्ताचे नमुने घेऊन डीएनए चाचणीसाठी पाठवायचे आहेत. विशालने घटकांबळे याच्याशी संपर्क साधला होता. दोन मध्यस्थांच्या माध्यमातून विशालने डॉ. हाळनोरला तीन लाख रुपये दिल्याचे तपासात उघडकीस आले. या प्रकरणात मध्यस्थांचा शोध घ्यायचा आहे. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने डॉ. हाळनोर याने अल्पवयीन मुलगा आणि इतरांचे रक्ताचे नमुने घेण्यासाठी वापरलेली सुई (सीरींज) आणि रक्ताचा मूळ नमुना अगरवाल दाम्पत्याकडे दिला असल्याची शक्यता आहे. या गुन्ह्याचा सखोल तपास करायचा असून, अगरवाल दाम्पत्याला पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील विशाल कोंघे यांनी युक्तिवादात केली. आरोपींच्या वतीने ॲड. प्रशांत पाटील यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर विशेष न्यायाधीश एस. एस. वाघमारे यांनी अगरवाल दाम्पत्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyaninagar accident case agarwal couple have original blood sample how many others are involved in this case pune print news rbk 25 mrj