लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला आणखी १४ दिवस बालसुधारगृहात ठेवण्यात यावे, असा अर्ज पुणे पोलिसांकडून बाल न्याय मंडळात दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या अर्जामुळे मुलाचा बालसुधारगृहातील मुक्काम आणखी काही दिवस वाढण्याची शक्यता आहे.

पबमध्ये मद्यपान करून भरधाव महागडी मोटार चालवून संगणक अभियंता तरुण आणि तरुणीच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या अल्पवयीन मुलाला १२ जूनपर्यंत बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश मंडळाने दिले. मुदत संपल्याने पोलिसांनी मुलाला आणखी काही दिवस बालसुधारगृहात ठेवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार मुलाला आणखी १४ दिवस बालसुधारगृहात ठेवण्यात यावे, असा अर्ज बुधवारी (१२ जून) दाखल करण्यात आला आहे. तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी अर्ज दाखल केला आहे.

आणखी वाचा-पुण्यानंतर पिंपरीतही पावसाच्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून चिमुरड्याचा मृत्यू

अपघातानंतर मुलाला पाच जूनपर्यंत बाळसुधारगृहात ठेवण्याचा आदेश मंडळाने दिला होता. त्यानंतर सात दिवसांची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे अल्पवयीन मुलाचा बालसुधारगृहातील मुक्काम १२ जूनपर्यंत वाढला होता. मुलाचे समुपदेशन सुरू आहे. तसेच व्यसनाधिनतेबाबत त्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. सुधारगृहातून सुटका झाल्यास त्याच्या जीविताला धोका आहे, अशी माहिती मंडळातील सरकारी वकील आणि पोलिसांनी मंडळाला दिली होती.

Story img Loader