पुणे : कल्याणीनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला वाचविण्याचा आरोप वडगाव शेरीचे आमदार आणि महायुतीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्यावर झाला होता. हा अपघात झाला त्यावेळी आमदार टिंगरे हे अपघातग्रस्तांना बघण्यासाठी रुग्णालयात न जाता या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले होते. तेथे त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा आरोप केला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभा निवडणुकीसाठी आमदार टिंगरे हे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून निवडणूक लढवीत आहेत. मात्र काही महिन्यांपूर्वी झालेले पोर्शे कार अपघात प्रकरण त्यांच्यासाठी अडचणीचे ठरत आहे. निवडणूक प्रचारात या प्रकरणाचा वापर करून विरोधक त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसतानाही विनाकारण याचे राजकारण केले जात असल्याने आमदार टिंगरे यांनी माझी बदनामी केली तर न्यायालयात खेचीन असा इशारा देत महाविकास आघाडीतील पक्षांच्या प्रमुख नेत्यांना नोटीस पाठविली आहे.

हेही वाचा – पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता

ज्येष्ठ नेते शरद पवार यांना देखील ही नोटीस दिल्याचे समोर आले होते. या नोटीसमध्ये पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे आणि वडगाव शेरीतील प्रतिस्पर्धी उमेदवार बापू पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे यांचेही नाव असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण अधिकच वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

वडगाव शेरी मतदारसंघाचे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार बापू पठारे यांच्या प्रचारसभेत दोन दिवसांपूर्वी खासदार सुळे यांनी, टिंगरे यांनी दिलेल्या नोटिशीबाबत सांगितले होते. ‘ज्येष्ठ नेते शरद पवार सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) नोटिशीला घाबरले नाहीत, ते तुझ्या नोटिशीला घाबरतील का,’ अशा शब्दांत खासदार सुळे यांनी जाहीर सभेत आमदार टिंगरे यांचा समाचार घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर टिंगरे यांनी पाठविलेली नोटीस चर्चेत आली होती.

हेही वाचा – लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार

टिंगरे यांनी वकिलामार्फत महाविकास आघाडीत सहभागी असलेले राष्ट्रवादी (शरद पवार), शिवसेना (ठाकरे), तसेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नावाने ही नोटीस पाठवली आहे. त्यामध्येच खासदार सुप्रिया सुळे आणि सुरेंद्र पठारे हे विविध माध्यमांतून पोर्शे कार प्रकरणात आपले नाव घेऊन टीका करत असल्याचा उल्लेख आहे. या नोटिशीच्या प्रती सध्या समाज माध्यमांवरून फिरत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyaninagar accident case mla sunil tingre notice names supriya sule sharad pawar pune print news ccm 82 ssb